Saturday, August 29, 2009

Artical published in Loksatta(Hasyarang) Augest 30,2009

मूड खल्लास


डॉ. विशाल तायडे, रविवार, ३० ऑगस्ट २००९:- म्हन्जी ल्हाणपणापास्न आसंच व्हत आलय. म्या ठरवलं एक, आनं झालं येगळंच. फकस्त तुम्हास्नी म्हणूनशान सांगतू, माला आयुष्यात लई काई-बाई व्हायचं व्हतं. धा गावात आय-बाचं नाव व्हईल आसं काईतरी करूनशान दावायचं हुतं. म्हन्जी आसं की, कोण्या म्होटय़ा माणसानं काई पराकरम केला, की मलाबी तेन्चा आदर्श ठिऊन तसंच करावं वाटायचं. सांगायचं झालं तर, आलमपीकमधी आपल्या एका पोट्टय़ानं कुस्ती हाणली आन् माह्याबी दंडाची बेंडकुळी टणाटणा उडय़ा माराया लाग्ली. म्हणलं, उद्यापास्नंच आखाडा लावायचा. थेट गेलू आखाडय़ावर पर म्हाई सिंगलहाड्डी बाडी प्हाहून उस्ताद हासाया लाग्ला. म्हणला, ‘लेका, तू कुस्तीपेक्षा गोटय़ा खेळ. मान्सानं हांत्रून प्हाहून तंगडं पसराया पायजे.’ आयची आन, सारा मूड खल्लास झाल्ता. पुन्यान्दी कुस्तीचं नाव काढलं न्हाई. त्या सानिया मिरजानं टेनिसात नाव केल्याचं टीवीवरची पोरगी म्हणली, मंग तिचा बा बी म्हणाला, की ‘माह्यावाल्या पोरीवर माला लई फकर हाये’ त्या राती मलाबी हापचड्डी घालूनशान मैदानावर उतरल्याचं सपान पडलं. म्हणलं, वरल्या आंगच्या वावरातून एखाद एकर येगळं करूनशान टेनिस कोरट करता ईल. जमलं तर मिरजाच्या पोरीलाबी खेळाया आनू. पर बाला तस सांगाया म्हाई जीभ रेटली न्हाई. आमचा बा म्हन्जी डेन्जर माणूस. वावराचं टेनिस कोरट करायचं म्हणल्ां तर तेनी मला बदाबदा हाणलं आस्तं. मंग त्यो ईचारबी गारठला. म्हन्जी असं हुतं, काई कराया जावं, तर घरचे हेल्पच करीत न्हाई. साऱ्या पिल्यानचा ईस्कोट करत्यात. आशानं परगती कशी हुणारं?गेल्या वरषी जालुऱ्याच्या जत्रला गेल्तो. तिथं टुरिंग टाकीजात शारूकचा शिनेमा पायीला- डान. म्हईनाभर डोक्शातून डान गेला नवता. म्हणलं, पुढचा सुपरस्टार आपणचं! मंग म्या तशी तैयारीबी सुरू केल्ती. वारकाला म्हणलं, डबल पैशे देतू, पर शारूकवानी कटिंग व्हाया पायजेन. कटिंग करून घराला आलू, आन् बा कानाखाली आवाज काढीत म्हणला, ‘काय येड-बीड लाग्लं व्हय रं तुला? ही काय सायराबानूवानी कटिंग गेली’ तुमास्नी सांगतू, सारा मूड खल्लास झाल्ता. पर म्हणलं, हिंमत हारून जमणार न्हाई. काईतरी येगळं करायचं म्हन्जी लोक बोलणारचं. तडक वावरात गेलू आनं शेळ्याम्होरं डानचे डायलाग म्हणाया सुरवात केली. आवो, डायलाग संपले तवा एकबी शेळी जाग्यावर न्हवती. म्हणलं, आपल्यावानी डान आपण्ांच. शेळ्याबी घाबरल्या.तो ये आर रयमान ठाव हाय नव्ह? आवो, त्यो ‘रूकमनी, रूकमनी शादी के बाद क्या क्या हुवा’ गाण्यावाला. हां, बराबर. तेला आसकर मिळालं व्हतं, तवा काय पानभर फुटू आल्ता त्येचा पेपरात. चानलवाले त अशा उडय़ा हाणीत व्हते, जसा आसकर त्येनलाच भेटला. समदीकडं रयमानचं कवतीक झाल्तं. मंग माह्यावालंबी टाळकं फिरलं. म्हणलं, भारताला नेक्स्ट आसकर आपणचं आणायचं. लागोलाग माळ्यावर चढलो, आन् काय-काय वाद्य गावल्यात त्ये धुंडाळून काढले. टाळ, ईना, पेटी, ढोलकं समदे माळ्यावर येडेवाकडे पडेल हुते. त्यावर पाली, कोळी, झुरळं येन्चा रियाज चालू व्हता. ते समद खाली काढलं, तवा म्हाया आज्जीला लय आनंद झाल्ता. तिला वाटलं, नातू बंद पडेल भजनी मंडळ पुन्हांदी सुरू करतोय. मंग म्या तिला म्हणलो, ‘आज्जे, हे आसकरसाठी हाय.’ मग लागोलाग म्या ‘सरगम’ बॅण्ड पार्टीचे तीन-चार वसताद गाठले, आन् म्हायावाली आयडिया त्येनच्या टाळक्यात ओल्ती. म्हणलं, ‘गडय़ांनू, नावबी हुईल आन् चिक्कार पैकाबी भेटल.’ समदे तय्यार झाले. रोज सांच्याला गावच्या समाजमंदिरात रियाज करायचं ठरलं. एवढा पैका मिळणार म्हणल्यावर तेन्नीबी बॅण्ड पार्टीचं काम सोडलं. वसताद मंडळीला तर आधीपास्न्ांच रयमानची गाणी येत हुती, मंग तेचीच तालिम सुरू केली. आमाला लय हुरूप आल्ता. म्हणलं, आयची आन, ह्या येळी आसकरला फारम भरूनच टाकू. तवर लय तयारी हुन जाईन. पर एका दिशी माशी शिंकली, साऱ्या सपनाचा चुथडा झाला. पाटलाचा डाकटर पोरगा समाजमंदिरात आल्ता. त्यो म्हणाला, ‘गडय़ाहो, आसकर आस मिळत नस्तं. सवोताची गाणी लागत्यात आन् तीबी शिनेमात घ्याया पायजेन. मंग त्यो शिनेमा आसकरला जाया पायजेन. आन, त्या रयमानची वाद्ये पायलीय व्हयरं? आर, तूमी त कुठबी टिकणार न्हाई.’ झालं, सारा इसकोट झाला. वसताद मंडळी माला शिव्या घालून पुना बॅण्ड पार्टीत गेली. आन, म्हायावाली टाळ, ईना, पेटी पुनीन्दा माळ्यावर जाऊनशान बस्ली. थितं पाली, झुरळ आन् कोळ्यांचा रियाज पुन्यान्दी सुरू झाला.अशी म्हाया सपनांची आन् पिल्यानची वाट लाग्ली. आटव्यांदा धाव्वी फेल झालो, तसा बा म्हणला, ‘बास! लई झाल शिकशान. आपल्याला गरामपंचायतीच्या योजनेत गाळा भेटतूय, तुला झकास किराणा दुकान टाकून देतू.’आता म्या किराणा दुकानात बसत आस्तू. बर चाललय दुकान, लगन होऊनबी आता धा-बारा वरषे झालेत. एक पोरगं हाय. बरा चाल्लाय टुकीटुकीचा संसार. त्यादिशी पोरगं शाळातून डायरेक्ट दुकानात आलं, आन् लाडीगोडी लावत म्हणल, ‘पप्पा, माला शिनेमान हिरू व्हायचंय.’खानकन तेच्या कानाम्हागं आवाज काढला आन् म्हणलो, ‘किशन्या, पोरा गपचूप शिक, ते आप्ल काम न्हाई. म्हयाबी डोकशात आशेच येडेवाकडे ईचार यायचे, शेवटी हातात हा तराजू आला लेका.’