Saturday, December 23, 2017

राजा मंगळवेढेकर...

महाराष्ट्र शासनाचा बालसाहित्याचा राजा मंगळवेढेकर पुरस्कार 'प्राण्यांचा व्हॉटस् अॅप आणि इतर गोष्टी' या बालकथासंग्रहास जाहीर झाला आणि राजा मंगळवेढेकर(1925-2006) या लेखकाविषयी आणखी माहिती जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली....
     खरं तर आपल्यापैकी प्रत्येकाने राजाभाऊंचं काही ना काही तरी लेखन वाचलेलं असेल. शालेय जीवनात पाठ्यपुस्तकातून त्यांची भेट झाली असेल. गोष्टी, कथा, कविता, कादंबरी, चरित्र, गीते, नाटक, विविध विषयांवरील लेख, पत्रं, अनुवाद असं चौफेर लेखन त्यांनी केले.                                                                                      राजा मंगळवेढेकर यांचे खरे नाव वसंत नारायण मंगळवेढेकर. 'असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, चंदेरी सोनेरी चमचमता चांगला...' यासारख्या अजरामर गीताचे गीतकार.
         सानेगुरुजींच्या संस्कारात वाढलेल्या राजाभाऊंनी आयुष्यभर आपल्या लेखनीचा उपयोग बालकांचे मनोरंजन आणि त्यांच्यावर संस्कार करण्यासाठी केला. बालकांसाठी लिहित राहणे हा तर जसा त्यांचा जीवनध्यास होता. त्यांनी आपल्या हयातीत दोनशेहून अधिक पुस्तकांचे लेखन केले.
         विषयांचे इतके वैविध्य त्यांच्या लेखनात होते की वाचकाने थक्क व्हावे. सुलभ रामायण, सुलभ महाभारत, ज्ञानयोगी ज्ञानेश्वर, लोकात्मा तुकाराम, राष्ट्रपिता गांधी, डॉ बाबासाहेब आंबेडकर, पंडित जवाहरलाल नेहरू, भारतरत्न भाग 1,2,3, मराठमोळा महाराष्ट्र पासून ते स्टिव्हनसनच्या जगप्रसिद्ध 'ट्रेलर आयलंड' चा अनुवाद 'बारकू' या नावाने त्यांनी मराठीत केला.         लेखनासोबतच कथाकथन हाही त्यांचा आवडता प्रांत. महाराष्ट्रभर राजाभाऊंनी कथाकथनाचे कार्यक्रम केले.                  स्वातंत्र्यलढ्यातही राजाभाऊंचा सक्रिय सहभाग होता. राष्ट्रसेवादल, सानेगुरुजी कथामाला, आंतरभारती अशा संस्थांच्या धुराही त्यांनी समर्थपणे सांभाळल्या.
          योगायोग कसा असतो पहा. 11 डिसेंबर हा राजाभाऊंचा जन्मदिवस. याच दिवशी महाराष्ट्र शासनाचा त्यांच्या नावे असलेला पुरस्कार माझ्या पुस्तकाला जाहीर झाला!