Saturday, March 22, 2014

चळवळ

ते म्हणाले आपण संघर्ष करू
आम्ही हो म्हणालो
ते म्हणाले आपण पेटून उठू
आम्ही मशाली हातात घेतल्या
ते म्हणाले आपण ही भ्रष्ट सत्ता
उलथवून टाकू
आमचंही रक्त सळसळलं
उज्वल उद्याची स्वप्न पहात.
* * *
मग त्यांना वरून बोलावणं आलं
आणि सारं काही शांत झालं.
* * *
आजकाल ते वरचं असतात
आम्ही मात्र होतो तिथेच आहोत
या मशालींचं काय करायचं
या विवंचनेत.....
फुत्कार

हा मोठा प्रश्नचं आहे की
कणा नसलेल्या आमच्या
शेकडो पिढ्या
कशा जगत आल्या
हजारो वर्ष
. . .
आमचा गांडूळचं करून टाकला की राव
तुमच्या व्यवस्थेनं
आम्हालाही मग तसचं वाटायला लागलं
आणि कोणत्या तोंडाकडून चालावं
हे ठरविण्यातचं
आमचं आयुष्य संपायला लागलं.
. . .
केवळ श्वास चालू होता
म्हणून त्याला जगणं म्हणायचं
आणि निसर्गानंही वाळीत
टाकलं नाही,हेच काय ते
आपलं भाग्य समजायचं.
. . .
पण आता सावधान !
आम्हाला आम्ही गांडूळ
नसल्याचं कळलयं.
आता आम्हाला काबूत
आणण्यासाठी तुम्ही
कितीही गारूडी आणा
शोषणाची सडकी
कात झुगारून
फुत्कार मारण्यासाठी
आम्ही सज्ज आहोत!
कंदुरी

तू उभा सोललेला
लटकतोय देवाच्या नावानं
आणि आम्ही जिभल्या
चाटत वाट पाहतोय
तुझ्या शिजण्याची
. . .
काही वेळातचं तू
आमच्या पोटात
सामावणार आहेस
आणि देवही तृप्त
होणार आहे
तुझ्या नैवेद्यानं
. . .
संकट कसलंही असू द्या
देव दूर करेल
अट एकचं
तुला मरावं लागेल
आमच्यासाठी !