Thursday, August 15, 2019

फिनीक्सच्या राखेतून उठला मोर: वाचायलाच हवा असा कथासंग्रह.

                                  जयंत पवार यांचा 'फिनीक्सच्या राखेतून उठला मोर' हा कथासंग्रह तिसऱ्यांदा वाचतोय. मराठी कथेला दोन पावलं पुढे टाकायला लावणारा हा कथासंग्रह आवर्जून वाचावा असा आहे. महानगरीय संवेदना या कथांचा गाभा आहेत. लेखक स्वत: मुंबईत राहत असल्याने त्यांच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचे पडसाद त्यांच्या विचारांवर आणि लेखनावर  पडणे स्वाभाविक आहे. त्यात जयंत पवार हे पत्रकार आहेत. आपल्या शोधक नजरेने त्यांनी आपल्या भोवतालच्या परिस्थितीला अचूक टिपले आणि तिला आपल्या कथांचे विषय बनवले.

                            अलिकडे मुळातचं मराठीत कथालेखन फार कमी होत आहे. त्यातही महानगरीय संदर्भ असलेले लेखन तर मोजकचं. या पार्श्वभूमीवर मला हा कथासंग्रह मोलाचा वाटतो. या संग्रहातील प्रत्येक कथा ही आपल्या पोटात एका कादंबरीची क्षमता बाळगणारी आहे. निवेदन शैलीच्या बाबतीत लेखकाने केलेले प्रयोग तर आश्चर्य वाटावेत असे आहेत. महानगरातल्या माणसाच्या जीवनातील गुंतागुंत रेखाटताना फार अभ्यासपूर्ण रितीने त्यांनी हे तंत्र वापरले आहे.

                              तंत्र आणि मांडणीच्या बाबतीत तर पवारांच्या लेखनीचे कौतुकचं करायला हवे. फ्लॅशबक तंत्राचा केलेला प्रभावी उपयोग, कथेच्या निवेदनातील प्रवाहीपणा , पात्र आणि कथावस्तूला साजेशी भाषा ही काही या संग्रहाची शक्तीस्थळं सांगता येतील. जयंत पवार हे मुळात एक अव्वल दर्जाचे नाटककार आहेत. 'अधांतर', 'काय डेंजर वारं सुटलंय' अशी ख्यातीप्राप्त नाटकं त्यांच्या नावावर आहेत. या कथांमधील दृष्यात्मकता त्यांच्यातील नाट्यलेखकाचं प्रतिनिधित्व करते असं म्हणता येईल.

                             या संग्रहाला निखीलेश चित्रे यांची दीर्घ प्रस्तावना लाभली आहे. जागतिक, भारतीय (विशेषतः हिंदी) आणि मराठी कथेचा आढावा घेणारी ही प्रस्तावना वाचनीय तर आहेच, किंबहुना साहित्याच्या विद्यार्थ्यांनी ती अभ्यासावी अशी आहे.

                              या कथासंग्रहाचे तसेच प्रत्येक कथेचे शीर्षक अतिशय बोलके आहे. शीर्षक वाचल्यावर कथेविषयी वाचकांची उत्सुकता वाढते. उदा.'साशे भात्तर रुपयांचा सवाल अर्थात युध्द आमुचे सुरू!' , 'फिनीक्सच्या राखेतून उठला मोर', 'चंदूच्या लग्नाची गोष्ट अर्थात सड्डम में टढ्ढुम', 'एका रोमहर्षक लढ्याचा गाळीव इतिहास' इ. कथा फार ताकदीने वाचकांसमोर येतात.
                               सन २०१० मध्ये लोकवाड्मय गृह या प्रकाशन संस्थेने काढलेला हा कथासंग्रह वाचक आणि समीक्षकांनीही उचलून धरला होता. नंतर त्याच्या आवृत्त्याही निघाल्या. या कथासंग्रहाला २०१२ सालचा साहित्य अकादमीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. जी.ए.कुलकर्णी (साहित्य अकादमी-१९७३)यांच्या नंतर तब्बल १९ वर्षांनी मराठीत एखाद्या कथासंग्रहाला अकादमी पुरस्कारावर आपली मोहर उठवता आली.

                              जागतिक साहित्यातील कथा वाचताना आंतोन चेकोव्ह, मॅक्सिम गाॅर्की, गाय द मोपसा, हारुकी मुराकामी, रेमंड कार्व्हर , प्रेमचंद, उदय प्रकाश ते अलीकडच्या चिमामिंडा ऐडेची अशा कथाकारांच्या कथांनी प्रभावीत झालेलो होतो. त्या श्रेणीत जयंत पवार यांची कथा ठेवता येईल इतक्या ताकदीची ती आहे.