Sunday, May 10, 2020

प्रेमचंद आणि बालसाहित्य



  जागतिक साहित्यातील भारताचे मानाचं पान म्हणजे मुन्शी प्रेमचंद. अन्तोन चेकोव्ह, मॅक्सिम गॉर्की, लिओ टॉलस्टॉय अशा शब्दप्रभूंच्या मांडीला मांडी लावून बसण्याची क्षमता असणारा हा एक थोर साहित्यिक. भारतीय समाजमनाची खऱ्या अर्थाने नस सापडलेल्या प्रेमचंदांनी विपुल लेखन केले. त्यांच्या कादंबऱ्या आणि कथांनी गेली सव्वाशे वर्षे वाचकांच्या मनावर गारूड केले आहे.

   वैश्विकता हे त्यांच्या लेखनाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य. प्रेमचंदांना कोणत्याही काळात वाचा, ते तेवढेच कालसुसंगत वाटतात. खरं तर लेखनातील ही वैश्विकताच त्या लेखकाला अजरामर करीत असते, जागतिक पातळीवर नेत असते. (त्यामुळेच मेक्सिकोच्या नोबेल पुरस्कार विजेत्या गाब्रिएल गार्सिया मार्कसच्या कथांतील पात्रही आपल्याला आपल्या आजूबाजूला वावरतांना दिसतात.) ही क्षमता प्रेमचंद यांच्या लेखणीत आहे.

            प्रेमचंदांनी लिहिलेल्या कादंबऱ्या आणि कथांनी त्यांना खरी ओळख मिळवून दिली. त्या वाचकप्रिय ठरल्या, समिक्षकांच्या चर्चेच्या विषय बनल्या. मात्र त्या तुलनेत त्यांच्या बालसाहित्याची फारशी दखल घेतल्या गेली नाही. त्यांचे निधन झाल्यानंतर १९४८ साली त्यांच्या बालकथांचा संग्रह 'जंगल की कहानियॉ' प्रसिद्ध झाला होता. याशिवायही त्यांच्या इतर काही बालकथा प्रसिद्ध आहेत. ज्यात ईदगाह, गुल्ली-दंडा, दोन बैलो की कथा अशा कथांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. या कथा बालकांच्या भावविश्वातून भारतीय समाजव्यवस्थेचे आकलन करण्याचा प्रयत्न करतात.

          २०१० साली मी प्रेमचंदांच्या काही बालकथा मराठीत अनुवादीत केल्या होत्या. त्या नंतर साकेत प्रकाशनाने प्रसिद्ध केल्या. आज सहज या बालकथा वाचतांना लक्षात आले की, सव्वाशे वर्षांपूर्वी लिहिलेल्या या गोष्टी आजही कालसुसंगत आहेत आणि आणखी शंभर वर्षांनंतरही त्या तितक्याच कालसुसंगत राहतील.