Thursday, April 22, 2010

I Am Vidya.........

अक्षरवाटा


प्रत्येक सोमवारी मी 'अक्षरवाटा' मधून वेगवेगळ्या पुस्तकांमधील एक चांगला आणि मला आवडलेला विचार पाठवते. मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन या दृष्टिकोनातून राबवला जाणारा हा उपक्रम आपल्यालाही आवडेल ही अपेक्षा.

आपल्या प्रतिसादाच्या अपेक्षेत

शुभदा रानडे-पटवर्धन

shubhadey@gmail.com / ranshubha@gmail.com

ही सूचना या मांदियाळीत नव्याने सामिल होणा-यांसाठी आहे.

-------------------------------------------------------------------------------------------------------------------

आय ऍम (सर्वानन) विद्या

लिव्हिंग स्माईल विद्या

अनुवाद : डॉ.विशाल तायडे

साकेत प्रकाशन, पृष्ठे : १५८, मूल्य : १५० रुपये



निर्वाण! किती दिवसापासून मी याची वाट पाहात होते. त्यासाठी मला मानहानीही सहन करावी लागली होती. माझा आत्मसन्मान, माझं स्वत्वं, माझा राग तर जणू मला माझ्या या स्वप्नासाठी गहाणच टाकावा लागला होता. प्रसंगी मी रस्त्यावर भीकही मागितली होती. त्यामुळे साहजिकच आजच्या रात्री मला झोप येणं शक्यच नव्हतं. विचारांच्या तंद्रीतच पहाट झाली. माझा उत्साह आणखी वाढला. रात्रभर जागी असूनही मला मरगळल्यासारखं वाटत नव्हतं. मग मी फेरीवाल्याकडून कॉफी घेतली. सुगंधी आयानेच मला बजावून सांगितलं होतं की निर्वाणाच्या आधी फक्त पेय पदार्थच घ्यावेत.



हा माझ्या आयुष्यातला सर्वात महत्वाचा दिवस होता. कुडाप्पा रेल्वे स्टेशनवर गाडी थांबताच प्रचंड गर्दीतून वाट काढत आम्ही बाहेर आलो. ऑटोरिक्षावाले तर जसे आमची वाटच पाहात टपून बसले होते. आम्हा चौघींना बघताच त्यातले बरेचसे आमच्या आजूबाजूला गोळा झाले. तो २६ एप्रिलचा दिवस होता.



कुठे जायचय? नागण्णा की बापण्णा? रिक्षावाल्यांमध्ये जणू आमच्यासाठी स्पर्धाच लागली होती.



"पण आया, यांना कसं माहीत की, आपण या दोन डॉक्टरांपैकी एकाकडे जाण्यासाठी आलो आहोत? " मला अजूनही रिक्षावाल्यांच्या प्रश्नाचे आश्चर्य वाटत होते. त्यावर नागाराणी हसत म्हणाली, ह्यांचं सोड. अग बाई, इथं तर नुकतच जन्मलेलं मूलही सांगू शकेल की, कुडाप्पाला आपल्यासारखे फक्त ऑपरेशनला येतात ते!"



एकदाचे आम्ही कुडाप्पाला पोचलो होतो. मी फार आनंदी होते. दवाखान्याजवळ आल्यानंतर रिक्षाने वेग कमी केला. आम्ही उतरून दवाखान्याकडे निघालो. दवाखाना रस्त्याच्या उजव्या बाजूला होता. हा मुख्य रस्ता नसला तरी रस्त्यावर बरीच गर्दी होती. बाजूलाच एक सिनेमा थिएटरही होतं. तिथं चंद्रमुखी सिनेमा चालू होता. दवाखान्यात बरीच गर्दी होती. दवाखान्यातल्या एका कर्मचा-यानं सुगंधी आयाला ओळखलं आणि तो पुढे झाला. आया इथं नेहेमी येत असावी. मग त्या कर्मचा-याशी तेलगूत काही तरी बोलत आया आम्हाला आत घेऊन गेली. त्यानं आम्हाला एका खोलीत बसवलं. त्या खोलीत तीन पलंग होते. त्यांच्यावर गादी किंवा चटई असं काहीही अंथरलेलं नव्हतं. खोलीतच एक लहानशी बाथरूम होती. त्यात एक पाण्याची बादली ठेवलेली दिसत होती. ही खोली खास लिंगबदल ऑपरेशन केलेल्यांसाठी राखीव असल्याचं दिसत होतं. ऑपरेशन थिएटर बघून तर मला धक्काच बसला. कसलं ते ऑपरेशन थिएटर? ही लहानशी, घाणेरडी खोली तर कत्तलखान्यापेक्षा वेगळी नसावी. त्या खोलीत एकच पलंग टाकलेला होता. त्याच्या शेजारी एक डॉक्टर बसलेला होता. त्याचा चेहरा पूर्णपणे झाकलेला होता. त्याचे फक्त डोळे चमकत होते. तो बराच म्हातारा असावा. खोलीत आणखी एक माणूस आणि एक बाईही होती. ते सहायक असावेत. त्यांच्याशिवाय एकही माणूस तिथं थांबू शकेल, इतकीही जागा तिथं नव्हती.



त्या सहायक कर्मचा-यांनी माझा स्कर्ट काढला आणि मला पलंगावर झोपायला सांगितलं. मी फार गोंधळलेले होते... काही सुचत नव्हतं... छातीची धडधड वाढली होती. पण त्यांच्यासाठी हे नवं नव्हतं. ते सगळेच अगदी सहजपणे आपल्या हालचाली करत होते. मला लहान लेकरासारखं अंग दुमडून झोपायला सांगितलं. लगेचच डॉक्टरने माझ्या पाठीच्या मणक्यात एक इंजेक्शन दिलं. मला फार वेदना होत होत्या. मात्र त्याची तिथं कुणाला पर्वा नव्हती. मी त्यांना पूर्ण सहकार्य करत होते. काही महिन्यांपूर्वीच सेनबेगमचं इथं ऑपरेशन झालं होतं. तिने मला ऑपरेशनची पूर्ण माहिती दिली होती. पाठीवर मणक्यात दिलेल्या इंजेक्शनमुळे कंबरेखालचा भाग बधिर होतो, हे तिचं वाक्य मला लगेच आठवलं. पण मनाची तयारी असल्यामुळे मला त्याची भीती वाटली नाही. फक्त एकदाच जेव्हा डॉक्टरने माझ्या पोटावर चाकू चालवला, तेव्हा वेदनेची कळ उठली. म्हणजे शरीराला पूर्ण बधिरता आलेली नाही, मी ताडलं. मग पुन्हा मला बधिरतेचं इंजेक्शन देण्यात आलं. वेदनेची लहर पुन्हा शरीरातून धावत गेली. मी हालचाल करण्याचा प्रयत्न केला; पण हातपाय हलत नव्हते. मला हळूहळू ग्लानी येत होती. तरीही डॉक्टरांच्या हालचाली मला स्पष्टपणे दिसत होत्या आणि वेदनेची ठसठसही चालूच होती. आता मला अक्षरश: तिथून लांब पळून जावसं वाटत होतं. किती या असह्य वेदना! पण या निर्दयी लोकांना त्याची काहीच पर्वा नव्हती. या निर्दयी डॉक्टरला आणि त्याच्या सहका-यांना मारूनच टाकायला हवं. पण आता त्यांच्या तावडीतून सुटका होणं शक्यच नव्हतं. मग मला आयानं सांगितलेली युक्ती आठवली. मी पुन्हा मनातल्या मनात माता... माता... माता... असा घोष सुरू केला. डॉक्टरांच्या हातातला चाकू माझ्या शरीराच्या अगदी आतपर्यंत शिरत असल्याचं जाणवत होतं. पाठोपाठ माझ्या तोंडून आर्त किंकाळ्या बाहेर पडत होत्या. त्याक्षणी मी माझा मृत्यू पाहिला. अखेर माझा अवयव माझ्यापासून वेगळा झाला होता. माझ्या शरीरापासून तोडलेला माझ्याच शरीराचा एक भाग. माझ्या डोळ्यातून आपोआप अश्रू वाहात होते...



नंतर माझी जखम शिवून टाकण्यात आली. मी शांतपणे सगळं बघत होते. वेदनेनं सगळं शरीर ठणकत असलं तरी एक वेगळाच आनंद मी अनुभवत होते. शेवटी माझं स्वप्नं साकार झालं होतं... माझं निर्वाण यशस्वीपणे पूर्ण झालेलं होतं.



आजचा दिवस माझ्यासाठी काही औरच होता. मी खूप समाधानी होते. मी आता एक स्त्री झाले होते. एक पूर्ण स्त्री. शरीरावर आता पुरुषत्वाच्या खुणा उरलेल्या नव्हत्या. मन अगदी भरून पावलं होतं.



अचानक मला माझ्या कुटुंबियांची आठवण झाली. अम्मा, मी आज एक स्त्री झालेय. मी आता सर्वानन राहिलेले नाही. मी विद्या झालेय. राधा, मी आता तुझा भाऊ राहिलेलो नाही. माझ्याकडे बघा ना अप्पा. आपली मुलगी म्हणून मला स्वीकार करा.



फक्त मी आणि मीच माझ्या हृदयाचं किंचाळणं ऐकू शकत होते...



---------------------------------------------------------------------------

एखाद्या लिंगबदल केलेल्या व्यक्तीला किंवा तिरुनानगाईला सहन कराव्या लागतात, त्या सगळ्या अडचणीतून विद्या गेलेली आहे. मात्र स्वसामर्थ्यावर तिनं स्वत:ला घडवलं. विद्याने भाषाशास्त्रात पदव्युत्तर पदवी मिळवली. तिला समकालीन नाट्य आणि चित्रपट क्षेत्रात खूप रस आहे. मदुराई आणि पुण्यात कित्येक वर्ष संघर्षात काढल्यानंतर सध्या ती चेन्नईत पीडित लोकांसाठी झटणा-या स्वयंसेवी संस्थेत कार्यरत आहे.

No comments: