जयपूर लिटररी फेस्टिवल साहित्याचं जागतिकीकरण
(An article published in Maharastra Times - 22 Jan. 2012)
follow this link:- maharashtratimes.indiatimes.com/articleshow/11580808.cms
विशाल तायडे
सध्या सुरू असलेला 'जयपूर लिटररी फेस्टिवल' हा साहित्यिक आणि पुस्तकप्रेमींच्या आकर्षणाचा विषय असतो. यंदा तो सलमान रश्दींच्या तिथे येण्या - न येण्याने गाजला. या फेस्टिवलच्या निमित्ताने अशा पुस्तक मेळ्यांनी निर्माण केलेल्या संस्कृतीविषयी -
जयपूर लिटररी फेस्टिवल मध्ये मी आणि जे. एम. कोएत्झी |
गेल्या वषीर्च्या जानेवारीतील ही घटना आहे. जयपूरच्या मध्यवस्तीतलं एक हॉटेल. 'हॉटेल डिग्गी पॅलेस' त्याचं नाव. त्याच्या मुख्य गेटसमोर फुटपाथावर मी उभा होतो. सकाळचे अकरा वाजले असावेत. सूर्य हळूहळू माथ्याकडे वळत होता. मात्र वातावरणातला थंडीचा कडाका कायम होता. उन्हातून दूर जायला मन तयार होत नव्हतं. याच डिग्गी पॅलेसमध्ये 'जयपूर लिटररी फेस्टिवल' आयोजित करण्यात आलं होतं - सगळं उत्साहपूर्ण वातावरण, येणाऱ्या-जाणाऱ्यांची लगबग. ते सगळं न्याहाळत मी उभा होतो. डिग्गी पॅलेसलाही चांगलचं सजवलेलं होतं. (पूवीर्च्या डिग्गी संस्थानच्या ठाकूरांची ही हवेली, १८६०मध्ये बांधलेली, जिचं रूपांतर आता हॉटेलमध्ये झालंय.) इथे येणाऱ्यांमध्ये पर्यटक, रसिक वाचक, साहित्यिक, प्रकाशक, एजंट, पुस्तक विक्रेते असे सगळेच होते.
काही वेळाने माझ्यापासून थोड्या अंतरावरच रस्त्यावर एक रिक्षा थांबली. रिक्षातून एक उतारवयातलं परदेशी जोडपं उतरलं. सहजच माझी नजर त्याच्यावर पडली आणि त्यातल्या म्हातारबाबावर खिळली. चेहरा ओळखीचा वाटत होता. साधारण सत्तरीचं वय, सडपातळ देहयष्टी, खांद्यावर लटकणारी एक छोटीशी बॅग आणि उत्सुकतेने आजूबाजूचा परिसर न्याहाळणारी भिरभिरती नजर. कोण असावेत बरं हे महाशय? मी अंदाज बांधत होतो. क्षणाक्षणाला माझी उत्सुकता वाढत होती, पण नक्की लक्षात येत नव्हतं. शेवटी न राहावून मी त्यांच्याजवळ गेलो. एव्हाना स्वारी फुटपाथावरून डिग्गी पॅलेसकडे चालायला लागली होती. त्यांच्या गळ्यात फेस्टिवलने पुरविलेलं ओळखपत्र होतं. त्यावर नाव लिहिलेलं होतं, जॉन कोएत्झी! आश्चर्याचा सुखद धक्का बसला - ज्यांना आतापर्यंत केवळ वर्तमानपत्रातील फोटोत पाहिलं होतं आणि जमलंच तर त्यांना भेटण्यासाठी म्हणून इथं जयपूरला आलो होतो, ते दोन वेळा बुकर आणि नोबेल पुरस्कारावर आपलं नाव कोरणारे 'जे. एम. कोएत्झी'. इतक्या सहज जयपूरच्या फुटपाथावर भेटावेत!
जागतिक साहित्य वर्तुळात आपल्या अबोलपणासाठी प्रसिद्ध असलेल्या कोएत्झींना मी स्वत:ची ओळख करून देताना, 'मी तुमची 'डिसग्रेस' कादंबरी मराठीत अनुवादित केली आहे', असं सांगितल्यावर ते तिथे फुटपाथवरच माझ्याशी खुलून बोलायला लागले आणि तिथेच माझ्यासोबत फोटोही काढून घेण्याची त्यांनी तयारी दाखविली. आपल्या टोकदार लेखणीने एकेकाळी द. आफ्रिकेतील वंशभेदी सरकारला घाम फोडणारा हा लेखक किती साधा, सरळ आणि मृदु स्वभावाचा वाटत होता!
सन २००६ पासून दरवषीर् जानेवारीच्या शेवटी जयपूरमध्ये हे साहित्य संमेलन रंगतंय(जे 'जयपूर लिट फेस्ट' म्हणूनही प्रसिद्ध आहे). अवघ्या काही वर्षात या संमेलनाने आंतरराष्ट्रीय पातळीवर आपलं स्थान निर्माण केलेलं आहे. पहिल्या संमेलनाला १०० प्रेक्षक आणि १८ साहित्यिक उपस्थित होते. त्या १०० जणांमध्येही बरेचसे जयपूर पाहायला आलेले पर्यटक होते, जे फिरत-फिरत चुकून संमेलनस्थळी पोहोचले होते, असं या संमेलनाचे एक संयोजक विल्यम डेर्लम्परल सांगतात. संमेलनाच्या सहाव्या वर्षातच म्हणजे २०११ साली ५००००हून अधिक साहित्यप्रेमींनी या संमेलनाला भेट दिली आणि जगभरातून २२५ साहित्यिक विविध सत्रांमधील कार्यक्रमांना उपस्थित राहिले! हे नोंद घेण्यासारखं आहे.
जयपूर लिटररी फेस्टिवलसारखे साहित्य मेळावे जगभरात विविध ठिकाणी होत आहेत. त्यांना भरभरून प्रतिसादही मिळतो आहे. त्यात फ्रँकफर्ट पुस्तक मेळा, बलिर्न आंतरराष्ट्रीय साहित्य संमेलन, इस्तंबूल लिटररी फेस्टिवल, कराची लिटरेचर फेस्टिवल, पॅलेस्टाईन फेस्टिवल ऑफ लिटरेचर, प्राग रायटर्स फेस्टिवल, सिंगापूर रायटर्स फेस्टिवल, व्हेनिस लिटररी फेस्टिवल अशी अनेक नावं सांगता येतील. पुस्तकांना आणि लेखकांना प्रसिद्धी देण्याचं व्यावहारिक गणित जरी या सगळ्या प्रयत्नांमागे असलं, तरी एरव्ही केवळ पुस्तकांतूनच माहित होणारे जागतिक साहित्यिक या निमित्ताने साहित्यप्रेमींना जवळून पाहता येतात, ऐकता येतात ही एक जमेची बाजू म्हणावी लागेल.
भारतातही जयपूरशिवाय मुंबई, कोलकाता, कोची, हैदाबाद, नवी दिल्ली अशा काही ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचे लेखक - पुस्तक मेळावे भरायला लागले आहेत. ज्यात जगभरातल्या नामांकित लेखकांना आवर्जून बोलावण्यात येतं आणि अगदी नियोजनबद्ध रितीने पुस्तकांना प्रसिद्धीही दिली जाते.
गेल्या काही वर्षात एक व्यवसाय म्हणून पुस्तक व्यवहाराने खऱ्या अर्थाने कात टाकली आहे. एखाद्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिकेट सामन्याचं आयोजन व्हावं तसं आयोजन या लिटररी फेस्टिवलचं होत आहे. उदाहरणच सांगायचं झालं, तर यावषीर्चं 'जयपूर लिट फेस्ट' २० ते २४ जाने. दरम्यान होत आहे. बड्या बड्या कापोर्रेट कंपन्यांनी त्याचं प्रायोजकत्व आणि सहप्रायोजकत्व स्वीकारलं आहे. जयपूरचं हे संमेलन सर्वच बाबतीत उजवं आहे. केलेल्या नियोजनाची शिस्तबद्ध अंमलबजावणी वाखाणण्याजोगी आहेे. यावषीर् विविध विषयांवरील एकूण १३५ सत्रं या संमेलनात होणार आहेत.
एक इंडस्ट्री म्हणूनही पुस्तक व्यवहाराचं क्षितीज विस्तारत आहे, मात्र या विस्तारणाऱ्या क्षितिजात प्रादेशिक भाषांचं स्थान कुठे आहे, याचाही विचार या निमित्तानं होणं आवश्यक वाटतं. आज अनुवाद प्रक्रियेला मोठ्या प्रमाणावर चालना मिळाली आहे, हे वारंवार मोठ्या कौतुकानं सांगितलं जातं, मात्र हे आदान-प्रदान समपातळीवर व्हायला हवं. प्रादेशिक भाषांतील दजेर्दार साहित्य इतर भाषांत अनुवादित होण्यासाठी या आंतरराष्ट्रीय व्यासपीठांचा मुत्सद्दीपणे वापर करायला हवा.
एक वाचक किंवा प्रादेशिक भाषेतील लेखक म्हणून अशा संमेलनांना भेटी दिल्याने आपल्याही जाणिवा विस्तारत जातात, दृष्टिकोण व्यापक होत जातो. अशा संधीचा फायदा घेऊन जागतिक दर्जाच्या साहित्यिकांना आपल्या मनात रेंगाळत असलेले प्रश्न विचारता येतात, त्यांच्याशी चर्चा करता येते. हा आनंदच काही और असतवाचककेंदी दृष्टिकोण ठेवून ही लेखक मंडळी स्वत:चं किती व्यवस्थित माकेर्टिंग करतात, थोड्या वेळामध्ये स्वत:ला, स्वत:च्या साहित्याला जास्तीत-जास्त मांडण्याचा कसा प्रयत्न करतात, हे या निमित्ताने अनुभवता आलं-येतं. कसदार लेखनासोबतच आजच्या जागतिकीकरणाच्या युगात लेखकाकडे हे 'इनपुटस्' असणंही तितकंच आवश्यक ठरतंय, हेही या निमित्तानं ठळकपणे जाणवलं.
या संदर्भाने आणखी आठवण सांगायची झाली तर, जयपूर संमेलनात मला ब्रिटिश कादंबरीकार जीन फ्रेझची मुलाखत घेता आली. मी पत्रकार नसतानाही अनेक आंतरराष्ट्रीय साहित्य पुरस्कार मिळविणाऱ्या या लेखकाने अगदी आनंदाने मला सविस्तर मुलाखत दिली. आणि ही मुलाखत कुठे-कुठे देता येईल, हेही स्वत:च सांगून टाकलं, किंवा नोबेल पुरस्कार विजेत्या ओरहान पामुकना त्यांची मी अनुवादित केलेली 'स्नो' कादंबरी दाखवल्यावर त्यांनी ते पुस्तक हातात घेतलं आणि एखाद्या नवख्या लेखकाला व्हावा, तसा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर मला पाहायला मिळाला.
आजच्या जागतिकीकरणाच्या युगात साहित्याला एक उत्तम 'प्रॉडक्ट' म्हणून बाजारात कसं आणता येईल, याचा विचार केला जातोय. 'किंडल'च्या माध्यमातून आजवर हजारो पुस्तकं 'ऑनलाईन' झालेली आहेत. आता अख्खं पुस्तक न वाचता केवळ ते कानात हेडफोन लावून ऐकायचं, ही 'टॉकिंग बुक्स'ची कल्पनाही रुजते आहे. या लिटररी फेस्टिवल्समधून हे काळानुरूप विषय चचिर्ले जातात, वाचकांसमोर तितक्याच समर्थपणे मांडले जातात व त्यांची मतंही आजमावली जातात.
या झपाट्याने विस्तारणाऱ्या साहित्य अवकाशामध्ये प्रादेशिक लेखकांनीही आपलं स्थान निर्माण करणं आवश्यक आहे. वेगाने व्यापक होत असलेल्या मानवी जाणिवा प्रादेशिक साहित्यातून व्यक्त व्हायला हव्यात हे जितकं खरं आहे, तितकंच ते राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय समुदायासमोर मांडण्याचं तंत्रही अवगत करून घेणं ही देखील काळाची गरज आहे. यासाठी आपल्या साहित्य संमेलनांमधून काही प्रयत्न करता येतील का? काही नवे पायंडे पाडता येतील का? या शक्यता तपासून पाहायला हव्यात.
No comments:
Post a Comment