आफ्रिका म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो रुक्ष,ओसाड,वाळवंटी अशा विशेषणांचं ओझं अंगावर पेलणारा खंड.जगातील सर्वात मागास आणि काळा खंड म्हणून हिनवल्या गेलेला. निग्रोंचा प्रदेश. केवळ माणसाच्या त्वचेच्या रंगावरून हा खंड काळा ठरत नाही, तर शतकानूशतके इथल्या माणसाने भोगलेलं दु:ख,दारिद्र्य,रोगराई,कुपोषण,यादवी आणि नरसंहारही याचं काळं असणं ठळकपणे अधोरेखीत करीत असतं.याचं प्रतिबिंबही या विशेषणांमध्ये झळकत असतं.मानवी अस्तित्वावर प्रश्नचिन्ह लावणाऱ्या बाबी येथील दैनंदीन जीवनाचा एक भाग असतात.हे सगळं आपण नेहमी वाचत असतो ,किंबहुणा बहुतेक वेळा आपण हे आणि असचं वाचत असतो.
मात्र इथे मी याच आफ्रिकेतील सृजनाची गोष्ट सांगणार आहे.एका व्यक्तीने आपल्या कर्तृत्वाने जगाला आपली आणि आपल्या देशाची दखल घ्यायला लावली त्याची ही कथा.
आफ्रिकेतील अनेक देशांपैकी नायजेरीया हा एक देश.सततच्या यादवीने छिन्नविछिन्न झालेला.उद्याचा सूर्य पाहता येईल की नाही इतकी जीवनाची अनिश्चितता असलेला देश.
याच नायजेरियाच्या इनगू(Enugu) शहरात १९७७मध्ये एक मुलगी जन्माला आली.ही कन्या आपल्या लेखणीने स्वत:ची आणि देशाचीही वेगळी ओळख निर्माण करील,हे खरं तर काही वर्षांपुर्वी कोणाला सांगूनही पटले नसते.पण दशकभरातच तिने हे करून दाखवलं.चांगल्या सुखवस्तू घरातून आलेली ही कन्या आपल्या थोरल्या बहिणीच्या पावलावर पाऊल टाकून डॉक्टर व्हावी,हे तिच्या पालकांना वाटणे सहाजिकच होते.त्यादृष्टीने तिने वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेशही घेतला,मात्र फार काळ ती तिथे रमू शकली नाही. पुढे ती अमेरिकेत गेली.तिथे तिने साहित्यात एम.ए.केले.
तशी लहानपणापासूनच तिला वाचन-लेखनाची आवड होती.मात्र आता या आवडीला निश्चित दिशा मिळाली.तिचा पेन समर्थपणे चालू लागला,पुढे लँपटॉपवर बोटं पळू लागली आणि नायजेरियाच्या दु:खांना शब्द फुटू लागले.जग वाचू लागलं.वाचून स्तब्ध होऊ लागलं. लिखाणाची धार हळूहळू वाढत गेली. प्रत्येक साहित्यकृतीसोबत ती समृद्ध होत गेली आणि तिच्या पाठोपाठ वाचकही. तिच्या रुपाने आफ्रिकेला आपल्या आवाज गवसला . तिला जग आफ्रिकन साहित्याचे पितामह चिनुआ अचेबी यांची समर्थ वारसदार म्हणून ओळखायला लागलं.ती लेखिका म्हणजे चिमामंडा नोझी अडीची(Chimamanda Ngozi Adichie).
गेल्या पंधरा वर्षात अवघ्या तीन कादंबऱ्या आणि एक कथासंग्रहाच्या रूपात वाचकांसमोर आलेली ही लेखिका आज स्त्रीवादी भूमिका घेऊन अतिशय कसदार लेखन करीत आहे.,प्रसंगी मंचावरूनही आपली भूमिका मांडत आहे.(संदर्भासाठी यु ट्युब पाहता येईल.)
अगदी सहजपणे पण गांभीर्याने मानवी दु:खाचे विविध पदर वाचकांसमोर उलगडून ठेवत ही लेखिका वाचकालाच कधी त्या कथेचा एक भाग करून टाकते हे त्याच्याही लक्षात येत नाही, मग तो अडीचीचं बोट धरून लागोसच्या(नायजेरियाची राजधानी)रस्त्यांवरून चालू लागतो.त्याला एका नव्या जगाचा परिचय होतो.समानानूभुती तत्वाला धरून अडीचीचं लेखन सुरु असतं.कथांमधून ती जितक्या समर्थपणे अवतरते तितक्याच ठामपणे ती आपल्या निबंधांमधून व्यक्त होत असते.कादंबरीसारखा मोठा कँनव्हासही कसा पेलायचा हे तिला चांगलचं अवगत झालेलं आहे.त्यामुळे 'पर्पल हँबिस्कस', 'हाफ ऑफ अ येलो सन' , किंवा अलिकडेची 'अमेरिकन्हाह' या प्रत्येक कादंबरीने विक्रीचे उच्चांक गाठले आहेत आणि अनेक जागतीक दर्जाच्या पुरस्कारांवरही आपली मोहर उमटविलेली आहे.
आजतागायत पस्तीसहून अधिक भाषांमध्ये अनुवादाच्या माध्यमातून पोहचलेली ही लेखिका आज केवळ ३९ वर्षाची आहे. एका कन्येची आई असलेली अडीची आज जागतीक किर्तीची लेखिका बनलेली आहे.
काही लेखकांची लेखनशैली उपजत असते.ते आपल्या अभिव्यक्तीत कायम आपलं स्वातंत्र्य टिकवून ठेवतात.त्यामुळे त्यांना कोणत्या एका साहित्यपंथाच्या खुंटीला बांधता येत नाही. ते स्वंयभू भूमिकेतून आपल्या मस्तीत लिहीत असतात आणि वाचकांचीही त्यांच्याकडून अशीच अपेक्षा असते.
चिमामंडा अडीचीचे लेखन अशाच प्रकारचे आहे.तिची प्रत्येक कथा आपला स्वतंत्र फ्लेवर घेऊन वाचकांसमोर येत असते.या कथाही स्वतंत्र कादंबरीचा विषय ठरु शकतात.त्यासाठी तिचा एकमेव कथासंग्रह 'द थिंग अराऊंड युवर नेक' वाचायलाचं हवा.
सन २०१० मध्ये मला चिमामंडा अडीचीची भेट घेण्याची संधी मिळाली होती.प्रसंग होता जयपूर जागतीक साहित्य संमेलनाचा.संमेलनाच्या एका सत्रात ती पाहूणी होती.तिच्यासोबत मंचावर होते साहित्याचे नोबेल विजेते ओरहान पामूक. एव्हाना सर्व संमेलन पामूकमय झालेलं होतं.मी त्यांची 'स्नो' ही कादंबरी मराठी अनुवादीत केल्याने व आदल्या दिवशीच त्यांना भेटल्याने भारावलेला होतोच.
याआधीच अडीचीची 'पर्पल हँबिस्कस' वाचून झालेली होती.काही कथा आणि निबंधही वाचनात आलेले होते.त्यामुळे तिला ऐकण्याची उत्सुकता होतीचं.मंचावर पामूक बराच वेळ बोलत राहिले.सुत्रसंचालकही त्यांच्याशीच संवाद साधत राहिला.अडीची आणि इतर वक्ते ऐकत होते.शेवटी तिला बोलायला संधी मिळाल़्यावर तिने मार्मिकपणे टोला लगावत सुरुवात केली ,'मला वाटलं की मला इथे फक्त ऐकायलाच बोलवल़य की काय?' सुत्रसंचालकही बघत राहिला. पामूकांच्याही चेहऱ्यावर स्मित हास्याची लकेर उमटली.नंतर तिने माईकचा ताबा स्वत:कडे घेत आपली साहित्य भूमिका सविस्तर मांडली हे वेगळे सांगणे न लागे.
स्थलांतरीतांचे मुद्दे् हे अलिकडच्या काळातील मोठ्या समस्या बनलेल्या आहेत. जागतीक समुदायही या समस्यांशी संघर्ष करतांना दिसतो.अडीची या प्रश्नाकडे राजकीय परिपेक्षातून पाहत असतांनाचं मानवी अंगानेही पाहतांना दिसते,किंबहूना या विषयाकडे एक राज़्य, एक शासन या भूमिकेतून पाहण्यापेक्षा एक माणूस या नात्याने बघावं हा तिचा आग्रह दिसून येतो.स्थलांतरीत लोकांची होणारी ससेहोलपट अडीचीच्या 'अमेरिकेन्हाह' कादंबरीतून अतिशय समर्थपणे समोर आलेली आहे.
सुक्ष्म निरीक्षणशक्ती,बघितलं ते शब्दात मांडण्याची ताकद,लेखिका म्हणून प्रसंगी निश्चित भूमिका घेण्याचे धाडस हे तिचे अंगभूत गुण आहेत.आपल्या पात्राच्या जगात स्वत: एक पात्र बनून वावरणारी चिमामंडा अडीची आज आफ्रिकेने जागतीक साहित्याला दिलेली एक मोठी देणगी आहे असे म्हटल्यास वावगं ठरु नये.
1 comment:
सर अनुभव छानच!!!अडिची आम्हाला लेखिका म्हणून मार्गदर्शक आहेत. स्नो कादंबरी वाचण्याची उत्सुकता वाढली.
Post a Comment