एकशेवीस नेट-सेट पोरा-पोरींना धोबीपछाड देत आमच्या पीएचडीधारी मित्राने तालुकावजा गावात मराठीची प्राध्यापकी पटकावली आणि आमचा जीव भांड्यात पडला!कारण,विद्यार्थी कम कार्यकर्ता कम संशोधक कम विचारवंत अशी बिरूदं मिरवल्यानंतर त्यांनी आता प्राध्यापक होणे ही काळाची गरज आहे अशी आमच्या समस्त मित्रपरीवाराची धारणा होती आणि गेली बारा वर्षे 'सर,सर' करीत मागेपुढे फिरल्याने त्यांना 'सर' करणे हे इच्छा नसतांनाही संस्थाचालकाला भाग पडले होते. त्याप्रमाणे ते प्राध्यापक झाले. लवकरचं खास वाचनासाठीचा बोटभर फ्रेम असलेला चष्माही त्यांच्या नाकावर आपले पक्के बस्तान मांडून बसला.नंतर केशवसुतांपासून आजतागायतच्या कवींवर त्यांच्या वक्तव्याचे घोडे सुसाट सुटू लागले.मग ते आजच्या पिढीतील नव्या दमाचे महत्वाचे समिक्षक कधी झाले हे त्यांचे त्यांनाही कळले नाही.(तसे एका लोकल पेपरात त्यांचे एका काव्यसंग्रहावरील दोन कॉलमचे समीक्षण छापून आले होते.ते त्यांनी फेसबुकवरही टाकले होते आणि दर तासाला किती लाईक झाले हे ही त्यांनी न चुकता दोन दिवस पाहीले. पण ते फारसे न मिळाल्याने आजच्या पिढीची वाचनाची आवडचं मुळात कमी झाल्याच्या निष्कर्षही त्यांनी देऊन टाकला होता..)
मग आमची एकदा सहज भेट झाली.आजकाल मराठी साहित्यात फारसं सकस लिहील्या जात नाही आणि त्यामुळे साहित्यापासून वाचक दूर जातोय याबाबत त्यांनी अधिकारवाणीने भाष्य केले. सकस न लिहिणाऱ्यांबद्दल(त्यांच्या फुटपट्टीनूसार) आकसही बोलण्यातून झळकून गेला.मग मी म्हणालो की,नेमकं सकस कसं लिहायचं असतं? तुम्हीच एखादं सकस पुस्तक लिहून काढा की...तेंव्हा नाकावरचा समिक्षकीय चष्मा वर ढकलतं ते म्हणाले, आमचं काम लिहिण्याचं नसतं तर ते लिहिलेल्यावर समिक्षा करण्याचं असतं !

No comments:
Post a Comment