Monday, October 30, 2017

ईपीतर।

नाम्या सांगळूदकरला पयल्याछूट शाळत भर्ती केल्त तवाचं गुर्जीनं वळखलं की हे बेणं लय तापदायक ठरनार.पयलीचे समदे पोरं-पोरी बोंबलत व्हते आन् नाम्या तेंच्या खोड्या काडत व्हता.त्यानं गुर्जीलाबी सोडल न्हाई.टेबलावर ठिवलेला तेंचा रुमाल घेतला आन् तेंच्यात खडूचे तुकडे भरले. चेंडू तयार केला आन् गुर्जीलाचं मधल्या सुटीत कँच कँच खेळू म्हनला.गुर्जीचं टाळकं सरकल.ते काई बोलनार याच्या आत नाम्यानं आसं भोकाड पसरलं की सारी शाळा हार्दुन गेली.हेडमास्तर धावत आले.नाम्यानं गुर्जीकडं बोट दाकवलं.लेकराला हानल म्हणूनश्यान हेडमास्तरनं गुर्जीलाच झापलं.गुर्जीनं कानाला खडा लावला.पुना या बेन्याच्या नादाला लागायचं न्हाई.
       नाम्या वरगात आसताना गुर्जी परशन ईचारत नसत.हे ईपीतर काय उत्तर दिल याचा नेम नवता.एकदा गुर्जी भूगोल शिकवत व्हते.पाठ चांगला रंगात आला व्हता.गुर्जीनं एकदम ईचारलं,म्हारास्टाची राजधानी कंची ?पोरं-पोरी उत्तर द्यायच्या तयारीत व्हते.तर नाम्यानं तोंड उघडलं.म्हनला,खालल्या की वरल्या अंगाची,गुर्जी? गुर्जी परेशान.तेंला काय बोलावं ते कळेना.मंग नाम्याचं बोल्ला,तुमीचं म्हनले व्हते ना ते नागपूरचंबी  हिवाळ्यात काई तरी आस्त.गुर्जी गपगार पडले.
        नाम्या अभ्यास सोडून बाकी गोष्टीत एकदम फास्ट.वरच्या वरगात जात ऱ्हायला तसा समद्याच्या कामाला यायला लागला.गुर्जीचं मोबाईल रिचारज करून आन,हेडमास्तरचा डबा आन,मास्तरीनबाईच्या तान्हया लेकराला सांभाळ अशा कामात तो एकदम परफेक्ट.ते लेकरू तर नाम्याच्या येवड अंगावर व्हतं की नंतर ते बाईकडंबी जायना.
     नाम्या सांगळूदकरचे बा ईट्टल सांगळूदकर.तेंचं लान्डरीचं दुकान .चार बाय पाच आकाराच.पर गावाच्या एकदम मेन चौकात.'सांगळूदकर प्रेस अँन्ड लान्डरी'.दुकान दनक्यात चालनारं.ईट्टल सांगळूदकर लय काटकसरी गडी.एक बीडी ईझवू ईझवू चारदा पिनार.कदीमदी गीराईक येकाद कापड दुकानातच ईसरुन जायचं.परत यायचच न्हाई न्यायला. ईट्टल सांगळूदकर सा मईने जावू द्यायचे,मंग हळूचं ते कापड वापरायला काडायचे.आसचं एकदा एक भारी शरट गीराईक ईसरल व्हतं.तेनी ते सा मईन्यानी भायेर काडल.नाम्याला आवडलं म्हणूनश्यान तेला ते बारीक करून घालाया दिलं.नाम्या जाम खुश.शरट घालून शाळत गेला. हेडमास्तरनं वळकल.तेंचचं शरट।जाम भडकले.पर काय उपयोग,शरट ल्हान झाल व्हतं.
       इंगलीष म्हन्जी सांगळूदकर फँमीलीची खानदानी पारबलेम.कोनीबी धाव्वी पास झाल न्हाई.फकस्त इंगलीषमुळं. शाळात इंगलीष नस्त तर आमच्या खानदानीत कलेकटर,इनीशपेक्टर झाले आस्ते,ईट्टल सांगळूदकर कापडावर इसत्री मारत म्हणले.
    त्यादिशी पाचव्यादा नाम्याचा धाव्वीचा निकाल लाग्ला. इंगलीष फेल.पर नाम्या म्हनला आख्ख्या खानदानीत इंगलीषमधी समद्याच्या जादा मार्क पडले-धा।
    हे ईट्टलरावालाबी पटलं. म्हन्जी पसतीस मार्क घ्यायला आजून सांगळूदकर खानदानाच्या तीनचार पिढ्या जावा लागतील... नाम्या म्हनला आन् सारे हासले।

1 comment:

rohini r mali said...

Namya lay bhari sir��