Monday, October 30, 2017

ब्यूटी पारलर ।

                नाम्या सांगळूदकरला पिरेम झालं आन् गड्याची दांडीचं गुल झाली.कशातबी ध्यान लागना.येऊनजाऊन डोळ्याम्होर सरदेसायाच्या नमीचाच चेरा झळकाया लाग्ला.पर तिला काई बोलायची डेरींगबी व्हईना.मंग नाम्यानं बापचं धार गेलेलं, पार खरवड झालेल दाडीचं बेलेड काढलं आन् पिक्चरच्या हिरोवानी बोट कापून घेत्ल.रगत याया लाग्ल,तसं नाम्यानं रगताला काडी लावत कागदावर "नमु,i Lowe you" खरडून त्येा कागूद शाळा सुटल्यासुटल्या नमीच्या हातात टेकीला.
       नमीबी लय भाद्दर.तिनं त्यो कागूद आपल्या बाला देवून टाक्ला.मंग काय ईचारता राव?सरपोतदार आरडाओरड करत डायरेक्ट नाम्याच्या घरी.तेनं आन् नाम्याच्या बानं पार चड्डी फाटूस्तर नाम्या बदडला.दुसऱ्या दिशी ती चिट्टी घेवून सरपोतदार शाळत हजर.तेंनी चिट्टी मास्तरला दाखवली.मास्तरनबी नाम्याला दोनदा बमकावलं.एकदा चिट्टी लिवली म्हणूनश्यान आन् दुसऱ्यांदा लवची पेलींग चुकीची लिवली म्हणूनश्यान.नाम्याच्या इज्जतीचा पार उकीरडा झाल्ता.समदे हासाया लाग्ले.नमीबी हाती लाग्ली न्हाई आन् इज्जतबी गेली.तेला लय जीव्हारी लाग्ल.मनाशी म्हनला आयच्यान जगन्यात काई राम न्हाई.त्या रातीला नाम्या तसाचं रडतरडत उपाशी झोपी गेला.
       
   दुसऱ्या दिशी त्यो लय उशीरा उटला.इज्जतीचा पार फालूदा झाल्ता. काय करावं ते तेला समजना. बा म्हनला,बास झाली तुही शाळा। नाम्यालाबी तेच पायजेन व्हतं.शाळात कधी आपलं डोकस् चालनार न्हाई हे तेला म्हाईत व्हतं.मास्तरबी येवूनजावून नाम्याला तेच सांगत व्हता.
    बा म्हनला दुकानात ध्यान घाल. वारकाचं दुकान. काय ध्यान घालायचं? समोर डोक्स आलं की भादर येवडचं बाला म्हाईत.समद्या फेशन खोट्या.जास्त दिस टिकत न्हाईत.डोकश्याची चंपी करनं सगळ्यात भारी फेशन.पारचीन काळापासून चालत आलेली ही फेशन.बा तेच्यात वस्ताद.म्हशीची आन् मानसाची सारकीच भादरनार.पर नाम्याला काई तरी येगळ करायची विच्छा व्हया लाग्ली.
         तेचं कारनबी तसचं व्हतं.नमीचा खटका काई नाम्याच्या डोक्शातून जात न्हवता.नमीला नटायची लय आवड.रोज नट्टापट्टा करनार आन् गावात फिरनार.ती दर हप्त्याला तालुक्याला ब्यूटी पारलरमंदी जाती आसं नाम्या समजलं आन् त्येची ट्यूब पेट्ली.
          त्यो लय डेरींग करून बाकडं गेला.बाला म्हनला, काई तरी येगळ करावं म्हनतू.पोरगं सोतावून काई तरी करायच म्हनतो म्हनल्यावर बाला आनंद झाल्ता.कर की लेका! काय करायच म्हनतू? बानं ईचारलं.गावात ब्यूटी पारलर सुरु करावं म्हनतो, नाम्या घाबरत घाबरत म्हनला.ते काय आसतं? बानं ईचारलं.जिंदगीभर वस्तरा आन् कैची बिगर दुसरं औजार म्हाईत नसलेला बा कोड्यात पडला.मंग नाम्यानं समजावून सांगितलं.पर नाम्या गावच्या पोरीबाळीचं डोक्स भादरनार म्हनल्यावर बाचं टाळकं सरकल.घरान्याची ईज्जत घालनार व्हय? बानं तेच्या कानाखाली जाळ काडला.
                     तवापासून नाम्या गपगुमान दुकानात बासोबत समोर आलेलं डोक्स भादरायचं काम करतू.पर नमीची आटवन झाली की ब्यूटी पारलर काडायचा ईचार काई नाम्याच्या डोक्शातून जात न्हाई...
                                                     @ विशाल तायडे

1 comment:

Unknown said...

पुढी काय झालं ह्ये बी समजून घ्याची लय इच्छा तयार झाली हाई .