Sunday, March 15, 2026

संत बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी जनसंपर्क अधिकारी तथा मुक्त पत्रकार श्री. सुनिल पाटील यांनी 'ढ' या बालकादंबरीवर लिहिलेले अभ्यासपूर्ण समीक्षण... ----------------------------------------------------------------------------- *ज्या 'ढ' शब्दाचा समाजात उपहास केला जातो, त्याच शब्दाला आत्मसन्मानाचा नवा अर्थ मिळवून देणारी विशाल तायडे यांची 'ढ' ही बालकादंबरी आता 'संदीप दळवी पुरस्कारा'ने सन्मानित होत आहे. शनिवार दिनांक २१ फेब्रुवारी रोजी म.सा. प च्या सभागृहात हा पुरस्कार दिला जाणार आहे. “ढ “ ही केवळ एका मुलाच्या संघर्षाची कथा नसून, ती प्रत्येक पालक आणि शिक्षकासाठी आत्मपरीक्षणाचा आरसा आहे. या पुरस्काराच्या निमित्ताने, गजूच्या चित्रमयी जगाचा आणि त्याच्या अंतर्मनातील संघर्षाचा घेतलेला हा विशेष मागोवा...* ———————————————— *कपाळावरचा ‘ढ’ पुसताना...* विशाल तायडे यांची ‘ढ’ ही बालकादंबरी केवळ एका मुलाच्या संघर्षाची कथा नाही; ती आपल्या शिक्षणपद्धतीतील आणि सामाजिक मानसिकतेतील खोलवर रुजलेल्या ‘लेबल संस्कृती’चे विश्लेषण करणारी साहित्यकृती आहे. ‘ढ’ हा शब्द केवळ अक्षर नाही; तो समाजाने लावलेला शिक्का आहे. लेखकाने त्याच शब्दाला कथानकाचा केंद्रबिंदू बनवत आत्मसन्मानाच्या नव्या अर्थाकडे नेले आहे. कादंबरीचा मुख्य नायक गजू आहे. अभ्यासात मागे पडणारा, वर्गात चुकांमुळे हसला जाणारा आणि सतत तुलना सहन करणारा गजू ही व्यक्तिरेखा आजच्या शिक्षणपद्धतीत सहज सापडणारी आहे. गजू जरी शैक्षणिक चौकटीत बसत नसला, तरी त्याच्याकडे चित्रकलेची आणि निसर्ग न्याहाळण्याची एक उपजत देणगी आहे. लेखकाने त्याच्या या सुप्त गुणांचा प्रवास ज्या पद्धतीने मांडला आहे, तो मुलांमधील सुप्त कलागुणांचा शोध घेण्याची गरज अधोरेखित करतो. कादंबरी गजूच्या बाह्य संघर्षाइतकीच त्याच्या अंतर्गत संघर्षाचीही कथा सांगते. गजूच्या अनुभवांतून ‘लेबलिंग’ची प्रक्रिया स्पष्ट होते. एखाद्या मुलाला वारंवार ‘ढ’ म्हटल्यावर ते लेबल त्याच्या आत्मभानात कसे झिरपते, हे लेखकाने सूक्ष्मपणे दाखवले आहे. बालमानसशास्त्रीय दृष्टिकोनातून, सततच्या नकारात्मक अभिप्रायामुळे मुलांमध्ये न्यूनगंड निर्माण होतो. कादंबरीत हा प्रक्रियात्मक बदल टप्प्याटप्प्याने दाखविला आहे. गुणाधारित स्पर्धात्मक शिक्षणव्यवस्थेवर अप्रत्यक्ष टीका येथे दिसते. कादंबरीतील मुख्य पात्र शैक्षणिक निकषांवर मागे पडलेले आहे. अभ्यासात कमी गुण, वर्गातील उपहास, तुलना आणि घरातील अपेक्षांचे ओझे या साऱ्यांच्या कचाट्यात त्याचे बालपण अडकते. मात्र कथा करुणेच्या चौकटीत न राहता आत्मशोधाच्या प्रवासाकडे वळते. लेखकाने कथानक रेखीय पद्धतीने मांडले आहे. प्रसंगांची मालिका वास्तववादी आहे; कृत्रिम नाट्य किंवा अतिनाट्यमय वळणे टाळली आहेत. त्यामुळे कथा विश्वासार्ह वाटते. तथापि, काही ठिकाणी प्रसंगांची पुनरावृत्ती जाणवते, विशेषतः नायकाच्या न्यूनगंडाचे चित्रण करताना. मुख्य पात्राचा अंतर्गत संघर्ष हे कादंबरीचे प्रमुख बलस्थान आहे. त्याच्या मनातील संभ्रम, स्वतःबद्दलची लाज, स्वतःला सिद्ध करण्याची तडफ हे सूक्ष्मपणे रेखाटले आहे. सहाय्यक पात्रांमध्ये शिक्षक आणि पालकांचे चित्रण वास्तवदर्शी आहे; काही पात्रांतून लेखकाने आजच्या कोरड्या आणि केवळ धाक दाखवणाऱ्या शिक्षण पद्धतीवर उपरोधिक प्रहार केला आहे. शिकवण्यापेक्षा ओरडण्यावर भर देणारी वृत्ती मुलांच्या मनावर भीतीचा पगडा कसा बसवते, हे गजूच्या उदाहरणातून स्पष्ट होते. सहाय्यक पात्रांमध्ये गजूच्या कदम बाई यांचे पात्र अत्यंत महत्त्वाचे ठरते. संपूर्ण जग जेव्हा गजूला 'ढ' म्हणून हिणवत असते, तेव्हा या शिक्षिकेच्या रूपाने त्याला एक भावनिक आधार मिळतो. मुलाच्या मनात आत्मविश्वासाची पेरणी करण्यासाठी एखाद्या मोठ्या व्यक्तीचा पाठिंबा किती आवश्यक असतो, हे मोरे सर, कदम बाई या पात्राद्वारे प्रभावीपणे उमटले आहे. भाषा साधी, ओघवती आणि बालवाचकांना समजणारी आहे. विशेषतः संवादांमध्ये असलेला प्रादेशिक लहेजा कथेला मातीचा गंध देतो, ज्यामुळे गजूचा संघर्ष आणि त्यातील परिवेश वाचकांना अधिक जिवंत वाटतो. लेखकाने उपदेशात्मक सूर टाळण्याचा प्रयत्न केला आहे काही ठिकाणी लेखकाने संदेश स्पष्ट करण्याच्या हेतूने थेट विधानात्मक शैली वापरली आहे; परंतु बालवाचकांच्या संदर्भात ती परिणामकारक ठरते. संवादांत नैसर्गिकता आहे. लेखकाने उपदेशात्मक सूर टाळण्याचा प्रयत्न केला आहे. भावनिक प्रसंगांमध्ये लेखक संयम राखतो; त्यामुळे कृत्रिम भावनावाद टळतो. ही शैली बालसाहित्यासाठी आवश्यक असलेली संतुलित अभिव्यक्ती दाखवते. ‘ढ’ ही कादंबरी मुलांच्या क्षमतेचे मूल्यमापन केवळ गुणांच्या आधारे करण्याच्या प्रवृत्तीवर भाष्य करते. ती सांगते की मुलाचे वेगळेपण हे त्याचे अपयश नसून त्याची ओळख आहे. हा आशय समकालीन शैक्षणिक वास्तवाशी थेट संवाद साधतो. आपण मुलांना समजून घेतो की केवळ गुणांच्या फुटपट्टीवर मोजतो? हा प्रश्न ही कादंबरी पालक आणि शिक्षकांनाही विचारते. कादंबरी वाचतांना काही पात्रे प्रतीकात्मक वाटतात; त्यांची अंतर्गत गुंतागुंत अधिक विस्तारली असती तर कथेला अधिक स्तर मिळाले असते. शेवट आशावादी आहे; मात्र परिवर्तनाची प्रक्रिया अधिक सविस्तर दाखवली असती तर प्रभाव अधिक ठसठशीत झाला असता. "गजूने स्वतःचा स्वीकार करण्याची प्रक्रिया ही इतर मुलांसाठी प्रेरणादायी ठरू शकते," ‘ढ’ ही कादंबरी केवळ बालवाचकांसाठी नव्हे, तर पालक आणि शिक्षकांसाठीही आत्मपरीक्षणाचा आरसा आहे. काही मर्यादा असूनही तिचा आशय प्रभावी आहे. बालसाहित्यात आत्मस्वीकाराचा विचार प्रामाणिकपणे मांडणारा हा प्रयत्न लक्षवेधी ठरतो. ढ’ हा शब्द येथे अपमानाचा नाही; तो आत्मभानाच्या जागृतीचा आहे. बालसाहित्यात ‘यश’ या संकल्पनेला नवा अर्थ देणारा हा प्रयत्न म्हणून ‘ढ’ची नोंद घ्यावी लागेल. *बाल कादंबरी-“ढ”* *लेखक- विशाल तायडे* *प्रकाशक सौरव प्रकाशन, छत्रपती संभाजीनगर* *मूल्य-रु १००/-* —————————————— *परीक्षण*- डॉ.सुनील पाटील,छत्रपती संभाजीनगर 9021777934

No comments: