Sunday, March 15, 2026

 ढ लेखक विशाल तायडे


लातूर / सोलापूर मधून प्रकाशित होणाऱ्या दै. एकमतमध्ये ज्येष्ठ साहित्यिक श्री. उमेश मोहीते यांनी 'ढ' या बालकादंबरीवर लिहिलेले समीक्षण...
-----------------------------------------------------------------------------

 *अनोख्या बालविश्वाची उद्बोधक कहाणी : ' ढ '*


     बालसाहित्यकार विशाल तायडे यांची ' ढ ' ही बालकांदबरी नुकतीच प्रकाशित झाली असून तीमधून लेखकाने बाल-कुमारविश्वाशी संबंधित एक अस्पर्शित नि तितकाच महत्त्वाचा असा विषय कौशल्याने हाताळला आहे आणि वाचकांना विचार करण्यास प्रवृत्त करून त्यांच्या दृष्टिकोणात बदल घडवण्याचे ' लक्ष्य ' साधले आहे. अर्थात या लेखनाचे प्रयोजनच हे असले तरी या लेखनात कुठेही कृत्रिमता किंवा आशयात कुठेही अतार्किकता वा विसविशीतपणा आलेला नाही, हे विशेष !


 गजू नावाचा अभ्यासात ' ढ ' असलेला एक संवेदनशील मनाचा पाचव्या इयत्तेतील मुलगा स्वतःची दर्दभरी कहाणी सांगतो आहे, अशी कल्पना करुन लेखकाने त्याचे भावविश्व इथे चित्रमय शैलीत मांडले आहे. हा गजू अभ्यासामध्ये ' ढ ' असल्यामुळे त्याला परीक्षेत नेहमी कमी मार्क पडत असतात आणि त्यामुळे त्याला काहीच येत नाही, असा शिक्षकांसहीत सर्वांचा गैरसमज झालेला असतो. त्याच्या या वैगुण्यामुळेच त्याचा घरी-दारी, शाळेत नि मित्रांमध्ये मानसिक आणि शारीरिक छळ होत असतो. परिणामतः या साऱ्या कुचंबणेमुळे तो सर्वांपासून दुरावतो आणि एकटे राहणे पसंत करतो. पुढे मात्र त्याच्यात निसर्गाची ओढ निर्माण होते. त्याचे भावविश्व पक्षी, प्राणी, फुलपाखरे, नदी नि डोंगर यांच्यामध्ये फुलत जाते. एवढेच नाही तर सोनी नांवाच्या मांजरीशीही त्याचे मैत्र जुळते आणि तो तिच्यासोबत मैत्रिणीसारखा बोलू लागतो ; खेळू लागतो. याच काळात त्याला चित्रे काढण्याचा छंद जडतो आणि तो चित्रांमध्ये रमू लागतो. शाळेतही त्याच्या चित्रकलेला बहर येतो. त्यातच एके दिवशी कदम मॅडमच्या दृष्टिस त्याने काढलेल्या चित्रांची वही पडते आणि त्याची चित्रकला पाहून त्या अक्षरशः थक्क होतात. शिक्षण म्हणजे नेमके काय असते, याची अगदी पुरेपूर जाण असलेल्या कदम मॅडम मग त्याच्या खऱ्या अर्थाने शिक्षिका होतात आणि त्याचे खऱ्या अर्थाने ' शिक्षण ' सुरु होते. कदम मॅडम त्याच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करुन त्याला प्रोत्साहन देतात. नंतर त्यांच्या मौलिक सहकार्याने अडगळीला पडलेला तो लाजरा- बुजरा गजू पुढे शाळेतल्या सर्वांचा लाडका चित्रकार म्हणून कसा विकसित होतो ? या त्याच्या ' सेल्फ आयडेंटिटी ' साठी कदम मॅडम नेमकी काय पावले उचलतात ? त्याला चित्रकलेचे अद्ययावत असे रंगरेषाविषयक मार्गदर्शन गजूला कोणाकडून मिळते ? नंतर त्याच्या चित्रकलेचा जागतिक पातळीवर कोणाकडून नि कसा गौरव होतो ? संपूर्ण शाळेत तो नावारूपाला कसा येतो ? थोडक्यात शाळेतील एक दुर्लक्षित मुलगा ते घरी-दारी सर्वांनाच त्याचा रास्त अभिमान वाटेल, असा त्याचा अवघड प्रवास कसा होतो ? या सर्वच प्रश्नांच्या उत्तरांसाठी त्या ही प्रेरक कहाणी प्रत्यक्ष वाचणेच इष्ट ठरेल, हे नक्की !

   ... थोडक्यात विशाल तायडे लिखित ही ' ढ ' ची कहाणी शिक्षण विषयक नवा ' दृष्टीकोन ' देणारी असून प्रत्येक मूल म्हणजे एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व असते आणि त्यामध्ये उपजतच अशी प्रतिभेची देण असते ; मात्र त्या देणगीचा ' शोध ' घेऊन तिला विकसित करता यायला हवे आणि हेच उद्दिष्ट शालेय शिक्षणाचे असते ; कारण त्या मुलाचे खऱ्या अर्थाने तेच ' शिक्षण ' असते, असा काहीसा बोध या उद्बोधक कहाणीव्दारे लेखक विशाल तायडे यांनी सूचित केला आहे. आधी म्हटल्याप्रमाणे या बालकादंबरीचे प्रयोजनच हा ' दृष्टिकोण ' मनी रुजवण्याचा असला तरी ओघवत्या शैलीच्या या लेखनातून ते अगदी अकृत्रिमतेने अभिव्यक्त झाले असल्याचा प्रत्यय येतो. गजूचे कोमल भावविश्व आणि त्याची भावस्पर्शी भावस्पंदने येथे अगदी संवेदनशीलतेने प्रकटली असल्यामुळे तो वाचकाच्या मनात ठसल्यावाचून राहत नाही. एकूणातच नेटके संवाद, सशक्त कथाबीज, जिवंत पात्र चित्रण आणि मोजक्या प्रसंगांतून संपन्न कथानकाची अगदी कल्पकतेने केलेली कुशल मांडणी इ. सर्व घटकांमुळे ही कहाणी मनोरंजन तर करतेच ; पण त्यासोबतच वाचक मनाची जाणीव विस्तृत करावयास भाग पाडते. म्हणूनच म्हणावेसे वाटते की छोट्या गजूची ही नवा आशय व्यक्त करणारी प्रेरक नि आशयसंपन्न कहाणी बालकुमार वाचकांसहित प्रौढ वाचकांच्याही पसंतीस उतरेल, यात संदेह नाही. हेच लेखक विशाल तायडे यांच्या लेखणीचे यश आहे आणि म्हणूनच ते अभिनंदनास पात्र आहेत. त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन !

ढ - ( बालकादंबरी )
लेखक - विशाल तायडे
प्रकाशक - सौरव प्रकाशन,छ.संभाजीनगर
                    ( मो.९९२२८६९९५७ )
पृष्ठे - ७२
मूल्य - १००
         - - - - -     
परीक्षण :

उमेश मोहिते,
अंबाजोगाई ( मो.७६६६१८६९२८ )

No comments: