Monday, March 16, 2026

महाराष्ट्रातील नव्या पिढीतील एक जाणकार आणि अभ्यासू शिक्षणतज्ज्ञ श्री. संदीप वाकचौरे, अहिल्यानगर यांनी 'ढ' या बालकादंबरीचे केलेले अभ्यासपूर्ण समीक्षण... ---------------------------------------- शिक्षणाचा दृष्टीकोन बदलवणारी बालकादंबरी- ढ शिक्षणाचा खरा आणि नेमका अर्थ कोणता ? असा प्रश्न अनेकांना पडतो. मात्र तत्वज्ञानाच्या परिभाषेत सांगण्याचा प्रयत्न आजवर अनेकांनी केला आहे. तरी सुध्दा शिक्षणाचे तत्वज्ञान वेगळे आणि वर्तमानातील वास्तव वेगळे हे आपल्याला सातत्याने अनुभवास येते. प्रत्येक मुल भिन्न आहे अस म्हटले जाते,प्रत्येक मुलाकडे निश्चित काही वैशिष्टयपूर्ण असतात. त्याची दखल शिक्षणात घेतली जात नाही. आपल्या व्यवस्थेने अत्यंत विद्वान,नावाजलेल्या अनेकांना शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर फेकले आहे. त्यांच्याकडे असलेल्या वैशिष्टय आणि कौशल्यांचा विचार शिक्षणाच्या प्रक्रियेत केला जात नाही. मुल काय विचार करते यापेक्षा आम्ही काय सांगतो हे महत्त्वाचे ठरते. आम्हाला हवे तसे विद्यार्थी घडायला पाहिजे,त्यांच्यामध्ये असलेल्या सुप्त शक्तिचा विकासाच्या अनुषंगाने फार काही शिक्षणात घडत नाही. त्यामुळे कांदबरी ज्या गजानन या विद्यार्थ्याभोवती फिरते. . तो गजानन हा शिक्षणाचे नेमके वास्तव आणि अपेक्षांच्या भूमिकेवर बोट ठेवताना दिसतो. त्याच्यामाध्यमातून या देशातील कोटयावधी बालकांचे मनातील भाव कांदबरीत व्यक्त झाले आहे. वर्तमानात शिक्षणाचा अर्थ केवळ मार्क असा झाला आहे. . पण अशावेळी शिक्षणाच्या संदर्भाने नेमका दृष्टीकोन प्रदान करताना पालक आणि शिक्षण क्षेत्रात काम करणा-या प्रत्येकाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी डॉ. विशाल तायडे यांची ‘ ढ’ ही कांदबरी प्रत्येकानेच वाचायला हवी. कालपर्यंतचा प्रवास,वर्तमानातील दृष्टीकोन आणि भविष्याची वाट यासंदर्भाने नेमकेपणाने भाष्य करत शिक्षणातील कोवळी पानगळीबरोबर अनेकांच्या उज्ज्वलतेच्या वाटा बंद करणा-या शिक्षण दृष्टीकोनावर सौम्यतेने असले तरी एका अर्थाने प्रहार करत भान देणारी ही कांदबरी आहे. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याच्या दृष्टीने शिक्षण विषयक दृष्टीकोन पेरण्यात ही कांदबरी निश्चित यशस्वी होते. लेखक स्वतः शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहे. अधिकारी पदावर असले तरी,मुळात शिक्षणाच्या दृष्टीकोन पेरण्याच्या प्रक्रियेतील एक महत्त्वाची भूमिका ते निभावणारे अधिकारी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यामुळे त्यांनी मनोगताच्या दोन शब्दातच ख-या शिक्षणाचा दृष्टीकोनाची पेरणी केली आहे. परीक्षेतील मार्कांवरून आपण मूलांचे मूल्यमापन करतो. कमी गुण मिळाले की,आपण त्याला ढ म्हणतो. खरच तो ढ असतो का ? की आपल्या मोजपट्टया तिथे कमी पडता आहेत. आपण त्याच्या अंगी असलेल्या इतर गुणांकडे दुर्लक्ष तर करत नाही ना ? तसं केल्याने त्याच्या व्यक्तिमत्त्वातील इतर पैलू दुर्लक्षित राहतात. त्याची मते आणि भावना दाबल्या जातात. आपण त्याला समजून घेत नाही. त्यामुळे आपण अधिक चांगला माणूस घडवण्यापासून दूर जातो आहोत. त्यामुळे मुलं स्पर्धेच्या गर्दीत हरवून जाते. शिक्षणातून असं घडत गेल्यामुळे कुंटुंबासोबतच समाजाचे नुकसान घडत जाते. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास दुणावेल असं काही केलं पाहिजे असा विचार सांगत,लेखक एकूणच शिक्षणाचा अत्यंत महत्त्वाच्या दृष्टीकोनाची पेरणी या कथानकातून करता आहेत. त्यामुळे ही कांदबरी असली,तरी ही मुळात शिक्षणाच्या दृष्टीकोनाभोवती फिरते आणि नेमकेपणाने शिक्षणातील वर्मावर बोट ठेवताना दिसते आहे. कांदबरीचा नायक असलेला गजानन हा शिक्षणासाठी वर्गात बसण्यापेक्षा त्याला बाहेरचा निसर्ग पाहण्यात अधिक रस असल्याचे दिसते आहे. त्याला बाहेर उडणारे फुलपाखरे आवडतात. त्यांच्याशी हितगुज करायला आवडते. . त्यांच्यासारखे त्याला उडायला आवडते. . मुळात बालपणात मुलांच्या नेमक्या भावना कोणत्या ? याविषयी अत्यंत सुंदरभाव चित्र आरंभीच रेखाटले गेले आहे. वर्गात शिक्षकांनी शिकवल्यानंतर अनेकदा विद्यार्थ्यांना समजत नाही,पण अनेकदा विद्यार्थी भितीने आणि आज्ञाधारकपणे ते मान हलवत हो म्हणतात. त्यामुळे गृहपाठ आणि प्रश्न विचारल्यावर नेमकेपणाने वास्तव कळते. सरांनी शिक्षा केली आणि दरवाजाच्या बाहेर उभे केले की,इतराने शिक्षा वाटते. . ते हसतात,टोमणे मारतात,त्यामुळे आरंभी रडू यायचे. आता रोजच घडू लागले. . पण बाहेर जी मजा आहे ना,ती वर्गात नाही. . हे सांगणारा गजानन शिक्षणाचा प्रवास कोणत्या दिशेने घडायला हवा याची दिशा स्पष्ट करतो. शिक्षण जीवनाभिमुख असावे असे विनोबा नेहमी म्हणत असे,आज शिक्षण आणि जीवन यांचा दुरान्वये संबंध उरलेला नाही. पुस्तक आणि त्यातील माहिती हेच शिक्षण झाले आहे. त्यामुळे मुलांना जगण्यात रस आहे. . आणि व्यवस्थेला पुस्तकाच्या माहितीत आणि मार्कात रस आहे. मात्र त्यासंदर्भाने गजानन पूर्ण कांदबरीत काही सांगतो आहे. . अर्थात तो या देशातील कोटयावधी बालकांचा प्रतिनिधी आहे. वर्गातील घडणा-या गमतीजमतींची नोंद घेतली आहे. दोन फुलपाखरू आणि त्यांचे नातेही विद्यार्थी कसे निर्माण करतात,याची अत्यंत सुंदर मांडणी कांदबरीत करण्यात आली आहे. त्यांच्याशी गप्पा मारायच्या आहेत. त्यांना मांडीवर नाही,तर खांद्यावर घेऊन बसायचे आहे. मी बोललेले त्याला समजेल का ? असा प्रश्न विचारत विद्यार्थी किती खोलवर जाऊन विचार करतात,फक्त पुस्तकातील माहिती त्यांना नको असते. . . कारण ती फक्त शब्दांचीच माहिती असते. मात्र त्यापलिकडे त्यांच्या संवेदनाचे प्रतिबिंब अनेक ठिकाणी उमटताना दिसते आहे. त्याला माझी भाषा येत नसेल,तर मी शिकवेल ही भावना मुलांच्या अंतर्मनातील भावना आहे. . सर्वांना सोबत घेऊन जाणे आणि मदत करणे ही मानवीवृत्तीचा स्थायी भाव आहे. माणूसपणाच्या भावभावनाचे अत्यंत तरल चित्र कांदबरीत अधोरेखित करण्यात आले आहे. सरानी शिक्षा केल्यावर फुलपाखरू होऊन गुलाबाच्या झाडावर बसलो असतो. . ही भावना म्हणजे मुलांच्या सर्जनशीलतेचे दर्शन आहे. गजूला चांगला क्रिकेट खेळता येतो. सचिन तेंडूलकर सोबतचे खेळण्याचे स्वप्न. . त्यावेळी त्याचे स्वप्नातील भरारी हे सारे वाचताना शिक्षणात ज्यांना ढ मानले जाते ती मुल देखील किती मोठी स्वप्न पाहतात हे सहज लक्षात येते. सचिन तेंडूलकरसारखे होण्याचे ध्येय आणि तसं स्वप्न हे मानसशास्त्रीय भूमिकेचे होणारे दर्शन मुलांसाठी काय करायला हवं हे दर्शित करणारे आहे. शाळेतील कदमबाई या नव्याविचाराशी नाते सांगणा-या बाई आहेत. मुलांच्या विकासाची प्रक्रिया आणि सुप्त गुणांचा विचारांची त्यांनी जाणीव आहे. त्यामुळे गजाननच्या अंगी असलेल्या सुप्तगुणांपैकी अभिनय आणि चित्र रेखाटन याची त्यांना जाणीव असणं. त्यातून स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने गजाननला मिळालेली मूक अभिनयाची भूमिका आणि त्यासाठी त्याला दिलेले प्रोत्साहन,त्याच बरोबर त्याचा आत्मविश्वास वृध्दिंगत करण्यासाठी बाईंने केलेले प्रयत्न वाचायला मिळतात. प्रत्येक मुलं मंचावर जाताना घाबरतेच,मात्र मंचावर जाताना बाईंनी त्याच्या कपाळावर केलेले चुंबन आणि त्यातून झालेला आनंद हे सारे वाचताना मानसशास्त्रीय दृष्टीकोनाची केलेली पेरणी महत्त्वाची ठरते. त्यावेळी त्याने केलेली भूमिका,मिळालेल्या टाळ्या हे सारे पाहिल्यावर घरच्यांच्या व शाळेतील शिक्षकांचा गजाननकडे पाहण्याचा बदलला दृष्टीकोन. त्यानंतर दुस-या दिवशी मुख्याध्यापकांनी बोलावून घेणे,त्याचे कौतुक करणे,त्याच बरोबर चित्राचे रेखाटने पाहण्यासाठी त्याच्या दप्तरातील वह्या बोलावणे आणि त्या पाहणे. शिक्षकांची व्यक्तिचित्र ऱेखाटन,मुख्याध्यापकांचे स्वतःचे चित्र पाहिल्यावर त्यांच्या चेह-यावर उमटलेले हास्य पाहिल्यावर गजूच्या मनातील निघून गेलेली भिती. त्यानंतर 26 जानेवारील चित्रांचे प्रदर्शन आयोजन,त्यासाठी शाळेने मार्गदर्शनाची घेतलेली जबाबदारी,पालकांच्या मनात निर्माण झालेला गौरव त्यातून त्याच्या चित्रकलेच्या विकासासाठी लागणारे आणून दिलेले साहित्य. . हा सारा प्रवास म्हणजे प्रत्येक मुलं भिन्न आहे हे सांगत जाणारी आणि त्याच्या वैशिष्ट्यांची नोंद घेण्यास भाग पाडणारी व्यवस्था उभी केली,तर देशाचे चित्र बदलू शकते. हे मनावर बिंबवले जाण्यास मदत होईल. त्याचवेळी कार्यालयातील कदमबाई आणि मुख्याध्यापक यांच्यातील हॉवर्ड गार्डनर यांच्या बहुविध बुध्दिमत्ता सिध्दांताच्या संदर्भाने झालेली चर्चा म्हणजे शिक्षणाचा नवादृष्टीकोन पेरणीचा विचार आहे. हे सारे अत्यंत समर्थपणे लालित्याने रंगवण्यात लेखक निश्चित यशस्वी झाले आहे. कांदबरीत शिक्षणाचे तत्वज्ञान पेरताना विद्यार्थ्यांना देखील आपल्यातील सुप्तगुणांच्या विकासाची पेरणी करण्यास दृष्टीदेणारी ही कादबंरी मुलाच्या मनात घर करण्यात यशस्वी झाली आहे. 26 जानेवारीला भरलेले प्रदर्शन,पाहुण्यानी केलेले उदघाटन,त्यांनतर झालेले कौतुक. मोरेकाका बोलायला उभे राहिले आणि त्यांनी गजाननचे चित्रांचे प्रदर्शन पाहण्याचे आवाहन केले. गजाननाने इतक्या लहान वयात अत्यंत सुंदर चित्र काढले आहे. जागतिक चित्रकलेच्या स्पर्धेकरीता गजाननाचे चित्र पाठवले गेले आहे. त्यातील एका चित्राची निवड त्याकरीता झालेली आहे. त्याचे चित्र पॅरिसच्या चित्रप्रदर्शनात ठेवले जाणार आहे. शाळेसाठी ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. यासंदर्भातील घोषणा झाल्यावर,झालेला टाळ्यांचा कडकडात,बॅंड पथकाने वाद्ये वाजवण्यास केलेली सुरूवात, हे सारे पाहून गजाननचे भारावणे आणि तेव्हा सर्वांच्या मुखातील “ गजानन,प्राऊड ऑफ यू ” हे उदगार. . हा सारा प्रवास म्हणजे एका ढ विद्यार्थ्याचा अभिमान वाटावा अशा विद्यार्थ्यापर्यंत झालेला प्रवास होता. हे सारे अनुभवताना गजानन हे पात्र देशातील प्रत्येक शाळेत दडलेल्या एक मुल आहे. शाळांनी आणि शिक्षणात कार्यरत असलेल्या प्रत्येकाने मुलांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलवला,तर देशातील शिक्षणाचे चित्र बदलू शकते. . हा विश्वास दे-यात ही कांदबरी यशस्वी होते आहे. त्यामुळे वाचक,शिक्षक आणि पालकांच्या दृष्टीकोनात बदल घडवण्याच्या दृष्टीने ही कादंबरी अधिक महत्त्वाची ठरणार आहे. शिक्षणाचे तत्वज्ञान,बालमानशास्त्र,अध्यापनशास्त्र अशा विविध शिक्षणाच्या संबंधित विषयांच्या अनुषंगाने जे पेरायला हवे यासंदर्भातील अत्यंत सुंदर मांडणी या बालकांदबरीत वाचायला मिळते. बाल कांदबरी असल्याने तिची भाषा ही अत्यंत सोपी आणि मुलांना समजेल अशीच आहे. भाषा सोपी असली, तरी त्यातून सांगण्यात येणारे तत्वज्ञान मात्र अधिक महत्त्वाचे आणि डोळे उघडणारे आहे. ही कांदबरी ज्या तत्वज्ञानावर आधारित आहे,ते तत्वज्ञान समजून घेत समाजमनात परिवर्तन झाले,तर उद्याचे शिक्षणात कोणीच ढ राहणार नाही. मुळात कोणी ढ नसते हा विचार प्रत्येक व्यक्ती कशी वैशिष्टयपूर्ण आहे हे दर्शित करणारे आहे. त्यामुळे शिक्षणात काम करणा-या प्रत्येकाना आत्मपरिक्षण करण्यास ही कांदबरी भाग पाडते. त्यामुळे बालकांदबरी असली, तरी तिचा विषय मात्र मोठयांनाही परिवर्तनाच्या दिशेने घेऊन जाणारा आहे. पुस्तकाचे नाव-ढ लेखक-विशाल तावडे प्रकाशन-सौरव प्रकाशन पाने-72 किंमत-100

No comments: