Monday, March 16, 2026

ढ डॉ. विशाल तायडे परीक्षेतील गुणांवर बुद्धी मोजू नये, हळू फुलणाऱ्या फुलाला कमी लेखू नये …………… बालसाहित्य लिहिणे निश्चितच सोपे नाही. बालनायकाच्या भूमिकेत शिरून बालसुलभ निरागस शैलीत ते व्यक्त होणे अधिकच आव्हानात्मक. तथापि हे आव्हान डॉ. विशाल तायडे यांनी समर्थपणे पेलले आहे. नुकतीच त्यांची ढ ही बालकादंबरी वाचली. हे एकाक्षरी शीर्षक वाचकांचे मन वेधून घेणारे आहे. ही गजू नावाच्या मुलाची गोष्ट आहे, जी तो स्वतः सांगत आहे. तो ढ आहे हे त्यालाही माहिती आहे. तो अभ्यासात मागे आहे. पण त्याच्या मनात विचारांची वेगळीच दुनिया आहे. तो आकड्यांत, अक्षरात अडखळतो. धड उत्तरे देत नाही. त्याला साधा गृहपाठही जमत नाही. त्याला कोणी मित्र नाहीत. त्याच्याशी खेळायला कोणी तयार नाही. खेळाच्या तासात तो एकटाच वर्गात बसलेला असतो. ढ मानल्या गेलेल्या मुलांच्या वाट्याला येणाऱ्या उपेक्षा, राग, तिरस्कार या गोष्टी त्याच्याही वाट्याला येतात. कथावाचकांना मात्र तसे काही वाटत नाही. वाटते ती हळहळ, आपुलकी व जिव्हाळा. एवढ्या ताकदीने गजूचे पात्र उभे केले आहे. कारण त्याच्यातील जमेच्या बाजू हे तेवढ्याच ताकदीने चित्रित केलेल्या आहेत. तो एकटा आहे पण एकाकी नाही. फुले, फुलपाखरे, नदी, डोंगर, झाडे , सोनी मांजर यांच्याशी त्याची मैत्री आहे. चित्रकलेची त्याला आवड आहे. अभ्यासात गती नसली तरी चित्रकलेत तो गतिमान आहे. रंग त्याच्याशी भांडत नाहीत. कागदावर रेषा रेखाटताना, रंगांच्या छटा भरताना तो अडखळत नाही, इथे तो स्वतःसारखा असतो. तो त्याच्या भावविश्वात दंग असतो. स्वतःची गोष्ट सांगत असताना त्याची निरागसता प्रत्येक प्रसंगातून सुंदररित्या प्रगट होते. उदाहरणार्थ त्याचे स्वतःचे हरवणे, नेलकटरने मांजरीची नखे कापणे, सचिन तेंडुलकर बरोबर क्रिकेट खेळण्याचे दीर्घ स्वप्न. बालवाचकांसोबतच मोठ्यांसाठी ही गोष्ट आहे.कारण ती आहे ढ समजल्या जाण्याच्या वेदनेची आणि स्वतःच्या क्षमतेचा शोध लागण्याची. मुलांसाठी तर आहेच, पण मोठ्यांनाही थोडं आरशात पाहायला लावणारीही आहे. व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास हा विचार शिक्षणव्यवस्थेने तात्त्विक पातळीवर स्वीकारलेला असला, तरी प्रत्यक्ष शाळांमध्ये वेगालाच बुद्धीचं मोजमाप मानलं जातं. पटकन वाचणारा, झटपट लिहिणारा, भरपूर गुण मिळवणारा ‘हुशार’ ठरतो; आणि त्या चौकटीत न बसणाऱ्याला लगेच ‘ढ’चा शिक्का बसतो. अभ्यासात गती कमी असणं म्हणजे बुद्धी कमी असणं—हा एक अलिखित नियमच जणू आजही शिक्षणव्यवस्थेत घट्ट रुजलेला आहे. पण ही कादंबरी हीच चौकट मोडते. शिकण्यात मागे पडलेला मुलगा अपयशी नसतो; तो फक्त वेगळ्या गतीने, वेगळ्या वाटेने पुढे जात असतो—हे हळुवारपणे पण ठामपणे सांगणारी ही बालकादंबरी आहे. अशा मुलातील सुप्त गुण व क्षमतांना फुलवणे, विविध अनुभवातून त्यांना शिकण्यास मदत करणे हे शिक्षकाचे व पालकांचे काम आहे. याचे भान असणाऱ्या काही व्यक्ती गजूच्या घरी व शाळेत आहेत. गजू अभ्यासात मागे का पडला आहे? त्यात त्याचा काही दोष आहे का? त्याचे पुढे काय होते? या सर्व प्रश्नांची उत्तरे पुस्तक वाचूनच वाचकांनी मिळवावीत आणि एक सुखद व समृद्ध अनुभव देणाऱ्या वाचनाचा आनंद मिळवावा. ढ जेवढी आशय संपन्न आहे तेवढीच तिची मांडणी देखील अतिशय आकर्षक आहे. सुंदर आकर्षक मुखपृष्ठ व चित्रांनी पुस्तकाचे सौंदर्य वाढले आहे. ब्लर्ब वरील गजूचे मनोगत वाचनाला प्रेरित करणारे आहे. मनात घर करणाऱ्या गजूच्या या गोष्टीने बालसाहित्यात अतिशय मोलाची भर घातली आहे. - आराधना कुलकर्णी,पुणे

No comments: