Monday, March 16, 2026
'ढ' मुलाच्या यशाची उत्तुंग भरारी
आजच्या टक्केवारीच्या प्रचंड वादळात गुणवत्ता हरवली आहे. मुलांचा सर्वांगिण विकास
नेमका कोणता आणि कसा याचे उत्तरही अधांतरीच राहते. शालेय जीवनात बालकुमारांच्या
मानसिकतेचा कितीएक आईवडील आणि शिक्षक विचार करीत असतील, हाच मुळात चिंतनाचा विषय
आहे. घर-कुटूंब, शाळा आणि समाज अशा वातावरणात बालकांच्या भावविश्वाला कसे हाताळायचे
या प्रश्नाचे उत्तरही निश्चित असू शकत नाही. टक्केवारीची जीवघेणी स्पर्धा यासह
शिक्षणातील जीवनकौशल्याचा अभाव दूर होण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. मुलांच्या
भावना समजून घेणे, इतरांशी तुलना न करणे यासह आत्मविश्वास कसा निर्माण करता येईल,
यासाठी धडपड करणारे शिक्षक असतात, अशा एक ना अनेक विषयावर कथेच्या माध्यमातून
प्रकाश टाकण्याचे प्रेरक लेखन बालसाहित्यिक डॉ. विशाल तायडे यांनी 'ढ' या
कथासंवादातून केले आहे. लेखक डॉ. तायडे यांनी शाळा, शाळेतील विद्यार्थी, शिक्षक,
आईवडील यासह बालमनावर कौटुंबिक घटनांचा कसा परिणाम होतो, अशा विषयावर 'ढ' या स्वगत
संवादातून चित्रण मांडले आहे. कमी गुण मिळविणारा 'ढ' मुलगा म्हणजे कोण असा प्रश्न
उपस्थित करीत कथेला सुरुवात होते. शाळेत जाणारा एक गजू नावाचा 'ढ' मुलगा आहे. घरचे
आईवडील, शाळेतील मित्र, शिक्षक कसे वागतात इथपासून ते शाळेतील प्रेरणा देणाऱ्या
कदमबाई, हेडसर, चित्रकार मोरे अशा पात्रामधून' ढ' कथा वाचकाला खिळवून ठेवते. वर्गात
'ढ 'म्हणून सतत अवहेलना होणारा गजू, घरातही आई आणि आजी सोडली तर इतरांच्या तुलनेत
चेष्टेचा विषय होणाऱ्या गजाननाच्या मानसिकतेचा विचार कथेतून अधोरेखित होतो.
चौथीपासून ते सहावी वर्गातील अनेक घटनांचा संदर्भकथेतून सुंदरपणे रेखाटला आहे.
शाळेतील वर्गाबाहेर सरांनी हाकलून दिलेला गजू आणि वर्गाबाहेर निसर्गातील पाने-फूले,
वृक्ष वेली, पक्षी, गुलाबाचे फूल आणि त्याची भावना गजूला कशी प्रेरक ठरते, अशा अनेक
घटनांचा अर्थ कथेचा नायक स्वगतात मांडतो. कथेतील पहिल्या प्रसंगात नायक स्वगत
मांडतो ते असे, की' सरांनी वर्गाबाहेर उभं राहायला सांगितलं, की मी फुलपाखर बनून
उडत उडत त्या फुलावर जाऊन बसलो असतो. यातून नायकाच्या मनातील घालमेल आणि विचार कसे
हे अधोरेखित होते. कथेतील चित्र काढणारा नायक, शाळेतील प्रजासत्ताक दिन समारंभात
मुकाभिनय करणारा गजू आणि शाळेत भरलेल्या चित्र प्रदर्शनाचा हिरो ठरणारा गजू असा
प्रवास लेखनाने बालकुमारांचे भावविश्व जपत प्रसंग डोळ्यासमोर उभे केले आहे. स्वगत
मांडताना नायकाला कोणते स्वप्न पडते, आणि क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर समवेत आपण खेळलो
असल्याचे स्वप्न कसा अदम्य आत्मविश्वास निर्माण करते, हा विचार कथेतून प्रेरणा
देणारा ठरतो. मुलांकडे दूर्लक्ष करणारा बाप नंतर मुलांसाठी कोणती गोष्ट करतो, की
त्यामुळे बाप लेकाचे नाते अधिक घट्ट होत जाते, अशा प्रसंगाचे चित्रण भावनिक अन
नातेबंधाला ओलावा देणारे कसे ठरते, हे समर्पकपणे मांडताना लेखक डॉ. तायडे यशस्वी
ठरतात. कथा संवादाची भाषा साधी, सोपी असल्याने सहजपणे मनाचा ठाव घेते. कथेतील
प्रसंग' गजूचे हरवणे, घरात आत्या येणे, वडिलाने गजूला बाहेर घेवून जाणे आणि
चित्रकलेचे साहित्य देणे, शाळेतील स्नेहसंमेलन, प्रजासत्ताक दिन, चित्रप्रदर्शन अशा
अनेक प्रसंगाचे स्वगत कथेचा नायक मांडतो तेव्हा रसिक वाचकही या भावविश्वात हरवून
जातो. असा अनुभव पुस्तक वाचताना येतो. डॉ. विशाल तायडे यांचे बालकुमारांचे भावविश्व
यावर सखोल चिंतन आहे. यातून 'मैत्री, छोट्या राजूची मोठी गोष्ट गोलू आणि राजू' या
बाल कादंबरीतून बालमानसिकतेचा प्रश्न मांडला आहे. एरव्ही अनुवादाच्या लेखनात
रमलेल्या डॉ. तायडे यांनी 'पतंग, प्राण्यांचा व्हाट्सअप आणि इतर गोष्टी, सईचे पंख'
अशा बालकथासंग्रहातून बालकुमारांच्या भावविश्वाला प्राधान्य दिल्याचे
लेखनसाहित्यातून दिसून येते. वर्गात 'ढ' म्हणून ओळख असलेला कथेचा नायक नंतर
सर्वाच्या अभिमानाचा विषय कसा होतो अशा प्रसंगातून कथा वाचकाला खिळवून ठेवते, हेच
डॉ. विशाल तायडे यांच्या लेखनाचे वेगळेपण आहे, हे विशेष. पुस्तकात प्रसंगाला
अनुसरून समर्पक अशी रेखाचित्रांनी विषय लक्षवेधी ठरतो. मुखपृष्ठ आणि आतील
रेखाचित्रातून चित्रकार बुध्दभूषण लोंढे यांची कलात्मचित्रशैलीने पुस्तकाची उंची
अधिक वाढलेली दिसून येते. 'ढ' लेखक डॉ.विशाल तायडे सौरव प्रकाशन, छत्रपती संभाजीनगर
पृष्ठे : ६२ किंमत शंभर रुपये समीक्षण - डॉ सुहास सदाव्रते
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment