Monday, March 16, 2026

................................ पुस्तक:-"ढ" ----------------------------------------------------- लेखक:- डॉ विशाल तायडे ------------------------------------------------------ प्रकाशन:-सौरव प्रकाशन, छत्रपती संभाजीनगर ------------------------------------------------------- प्रकाशक:-मिलिंद बाबुराव जगताप, छत्रपती संभाजीनगर ------------------------------------------------------- मुखपृष्ठ व रेखाचित्रे:- बुद्धभूषण लोंढे, पुणे ------------------------------------------------------ प्रथम आवृत्ती:- ९ डिसेंबर २०२५ ------------------------------------------------------- किंमत:- १०० रूपये ------------------------------------------------------ पुस्तक परिचय:-डॉ. प्रभाकर शेळके, जालना संपर्क:-९९७५१३७३३७ -------------------------------------------------------- #बालकांचे_कौशल्य_विकसित_करणारी_कांदबरी_:"ढ" डॉ. प्रभाकर शेळके, जालना महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट बालसाहित्य पुरस्कार विजेते डॉ. विशाल तायडे यांची "ढ" ही बालमानसशास्त्र उलगडून दाखवणारी एक उत्कृष्ट बालकादंबरी आहे. तसेच बालक, पालक व शिक्षक यांचे मन समृद्ध करणारी आहे. आपल्याला बाळ जन्माचा आनंद असतो. पुढे शिक्षण व संस्कार शिदोरी बांधून मुलांचे व्यक्तिमत्त्व विकसित होते. तो आनंद मौलिक असतो. आजच्या एआयच्या जगात हे सारे पाह्यला मिळते. तुज कळते परि ना वळते. मग उगीची मनाला छळते. बाल मनावर संस्कार गिरवताना त्याची रुची संपन्नता पाहूनच त्याला कौशल्य प्राप्त करता येते. या बालकादंबरीचा नायक गजू. गजूला शालेय पुस्तकात रुची नाही. त्याला सभोवताल आवडतो. शाळा बाहेरचे विश्व आवडते. फुलपाखरू, फुलांचे रंग, वानर, झाडं, पाने, फुले, आकाश, चंद्र, चांदणे यात तो रंगून जातो. त्याच्या वहीत आई ,आजीचे चित्र, शाळेतले काळे सर, हेडमास्तर, झाडुवाली मावशी, शाळेचा शिपाई यांची चित्रे. आईचं चित्र काढलं की आजीचे चित्र तयार करता येते. फक्त तोंडावर सुरकुत्या काढले की झाले आजीचे चित्र. त्याची सोनी मांजर. तिचे हुबेहूब चित्र. त्याला फुलपाखरू होऊन उडावे वाटते. त्याला क्रिकेट खेळणे भंयकर आवडते; पण मित्र त्याला खेळात घेतं नाहीत. कारण त्याला खेळात घेतलं तर आपण जिंकणार नाही असं त्यांना वाटतं. गजू स्वप्न पाहतो. त्याला सचिन तेंडुलकर यांच्याबरोबर बॅटिंग करायला मिळते. सचिन त्याच्या कानात येऊन बोलतो. तो धुंवाधार बॅटिंग करतो. भारताला मॅच जिंकून देतो. आई बाबांच्या डोळ्यात आनंद अश्रू असतात. टाळ्यांच्या कडकडाटात त्याचे स्वप्न पूर्ण होते. तो शाळेत पाठीमागे बसतो. काळे गुरूजी त्याला 'ढ' ही पदवी देऊन टाकतात.मग सारेच त्याला 'ढ' म्हणतात. यामुळे त्याला मित्रमंडळ नसते. तो आपल्या वहीत चित्र काढत असतो. त्याचे भावविश्व म्हणजे मन मुक्त जगावे. गजू हरवल्याची गोष्ट सांगतो. गजू का हरवतो. आई त्याला मार्केटला सोबत घेऊन जात नाही. तो रडतो, रूसतो. गच्चीवर टेरेसवर जाऊन झोपून राहतो. हे कुणालाच माहीत नसते. खूप वेळ हे नाट्य चालू असते. फोन, शेजारी पाजारी, पोलिस स्टेशन, आई रडते तेव्हा त्याला जाग येते. लोकं जमा होतात. शेवटी गजू सापडतो. आईचे रडणे पाहुन तोही रडतो...त्यावेळेस आईचे आसवांनी भरलेले डोळे. आई रडते तेव्हा तोही रडतो. आईने त्याला आपल्या कवेत घेऊन कवटाळणे, आजीच्या चेहऱ्यावरचे आनंदाचे भाव, ताईचे ओतप्रोत प्रेम. हा प्रसंग वाचकांना व्याकुळ करुन जातो. सारी मुलं स्नेहसंमेलनात विविध स्पर्धेसाठी जातात. कदमबाई गजूला शोधत वर्गात येतात. तो खिडकीत बसून चित्र काढीत असतो. गजू थोडा तोतरा बोलतो. त्यामुळे सारी मुलं हसतात. गजूला अवघड नावे उच्चारायला कठीण जाते जसे- सभागृह. तो मनाने निर्मळ, निर्लेप आणि नितळ स्वभावाचा मुलगा आहे. कदमबाई त्याला स्नेहसंमेलनात मुक अभिनय करण्यासाठी सहभागी करून घेतात. कदमबाईने गजूच्या मनात आत्मविश्वास निर्माण केलेला असतो. गजूचा अभिनय उत्तम झाला. "आई बाबांचे डोळे भरून आले. आई, बाबा, आजी, ताई स्टेजच्या पाठीमागे आले. कदमबाईने त्याला घट्ट पोटाशी धरलं. टाळ्यांच्या गजरात गजूचे डोळे पाणावले. बाबांना तर काय करु आणि काय नको असं झालं होतं. त्यांच्या डोळ्यांना धारा लागल्या होत्या. ते 'माझा गजू' असं म्हणतं माझे मुके घेत होते. त्यांच्या कडेवर मला खूप छान वाटत होतं. कारण कितीतरी वर्षांनी बाबांनी मला जवळ घेतलं होतं."(पृष्ठ ५१) हा प्रसंग लेखकाने अतिशय आशय संपन्न मांडला आहे. वाचकांचे अंतरंग हेलावून टाकणारे प्रसंग आहे. बालमनाचे भावविश्व जसे - गजूला फुलपाखरू व्हावे, झाडं व्हावे, मांजरीचे नखे वाढले आहेत ती काढावी. आई कसे माझी नखे वाढू देतं नाही. गजू सोनी मांजरीचे नखे काढतो तेव्हा ती बोचकारते. गजू रक्तबंबाळ होतो. गजूला बोचकारले म्हणून सोनीची घरातून हकालपट्टी होते. गजूला वाईट वाटते. माझ्यामुळे सोनी घर सोडून गेली... हे प्रसंग हळवे करून जातात. स्नेहसंमेलनात गजूचा अभिनय चांगला झाला; पण अभ्यासही कर असे म्हणणारे काळे सरांचे नितळ श्रेध्दय मन इथं दिसून येते. गजू सहावीत जातो. कदममॅडम व मुख्याध्यापक यांच्यातील अभ्यासपूर्ण संवाद हा महत्त्वाचा आहे. जसे "प्रत्येक मुलं पुस्तकी अभ्यासातच हुशार असतं असं नाही. मुलामध्ये वेगवेगळ्या क्षमता असतात. आपण त्या क्षमता ओळखला हव्यात आणि त्याप्रमाणे त्यांना संधी द्यायला हवी."(पृष्ठ ५२)मुख्याध्यापकाच्या परवानगीने प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने गजूच्या चित्रांचे प्रदर्शन ठेवल्या जाते. हेडसर, काळेसर, कदम मॅडम, केशव मामा, ही हुबेहूब चित्र पाहून हेडसर खुश होतात. प्रजास्ताक दिनी प्रमुख अतिथींच्या शुभहस्ते फित कापून चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन होते. आई, आजी आणि बाबांच्या डोळ्यात आंनदाचे अश्रू येतात. गजू स्टेजवर मागे बसलेला असतो. प्रमुख पाहुणे भाषणात गजूच्या चित्रांचे कौतुक करून अभिनंदन करतात. शेवटी मोरेकाका उठतात. ते म्हणतात की मी आनंदाची बातमी सांगू इच्छितो. "फ्रांसची राजधानी पॅरिस येथे चित्रांचे जागतिक स्तरावरील प्रदर्शन भरते. यात जगभरातले चित्रकार सहभागी होतात. हजारो डाॅलर्संना या चित्रांची खरेदी विक्री होते. गजूचे चित्र मी पाठवले होते. त्यातल्या एका चित्राची निवड झाल्याचा ई-मेल आलेला आहे. गजाननचे मुळचित्र या प्रदर्शनात ठेवण्यासाठी मागितले आहे. हा गजाननसाठी, शाळेसाठी आणि आपल्या सर्वांसाठी फार मोठा सन्मान आहे "(पृष्ठ ६७) अशी ही मनोज्ञ दर्शक गोष्ट आहे. मलपृष्ठावर लेखक विशाल तायडे सर लिहितात "मी गजू, तुम्ही माझी गोष्ट वाचताय याचा मला खूप आनंद होत आहे. या गोष्टीतून मी तुम्हाला मी खूप गमती जमती सांगणार आहे. आणि माझ्या मित्रांची ओळख करून देणार आहे. फुलं, फुलपाखरू, नदी डोंगर, झाडे हे सगळे माझे मित्र आहेत. माझी एक मैत्रीण आहे. सोनी तिचं नाव. पण मला ना सगळे "ढ"समजतात. मठ्ठ, बुध्दू म्हणतात. कारण काय तर म्हणे मला परीक्षेत कमी मार्क पडतात. मला काहीचं येतं नाही. सगळ्यांना वाटतं. मात्र माझी ही गोष्ट वाचल्यावर तुम्हीच ठरवा की, मी "ढ"आहे का ते?"(मलपृष्ठ) बालमनाचा मानसशास्त्रीय समुपदेशक या भूमिकेतून एक सृजनशील, चिंतनशील, चिकित्सक निस्सीम अभ्यासक डॉ विशाल तायडे यांच्या या बालकांदबरीत ते पालक, बालक, अध्यापक यांना शिक्षण संजीवनी देऊन जातात, जसे - "हावर्ड गार्डनर या अमेरिकन अभ्यासकानेही संशोधन आणि प्रयोगामधून हे दाखवून दिले आहे, की मानवी बुद्धीमत्ता ही एक प्रकारची नसते. तर ती आठ प्रकारच्या असतात. त्याला त्यांनी 'बहुविध बुध्दीमत्ता' असे म्हटले आहे. उदाहरणच सांगायचे झाले तर एखाद्या खेळाडूकडे शारीरिक बुध्दीमत्ता अत्यंत चांगली असेल; पण त्याच्याकडे गणितीय किंवा संगीताची बुध्दीमत्ता उत्तम असेलच असे नाही. क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचेच उदाहरण घ्या ना. त्यांनी बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले; मात्र खेळामध्ये जागतिक स्तरावर नाव कमावले. आपल्या देशाने तर भारतरत्न म्हणून त्यांचा गौरव केला. हे कशामुळे शक्य झाले? तर बालपणातच त्यांच्या पालकांनी आणि शिक्षकांनी त्यांचे खेळातील कौशल्य ओळखून, त्यांना त्यात संधी दिली."(पृष्ठ ५३) बालमानसशास्त्र उलगडून दाखवणारी ही कादंबरी खूपच अप्रतिम, आशय संपन्न, सृजन समर्पक झाली आहे. बालसाहित्यिक विशाल तायडे अभ्यासक आहेत ते पालकांसाठी दोन शब्द लिहितात "प्रत्येक मुलं जन्माला येतं ते स्वतंत्र माणूस म्हणून. त्याचं स्वतंत्र व्यक्तिमत्त्व असतं. ते हळूहळू शिकत राहतं आणि फुलतं राहतं. कधीकधी त्याची वाढ आणि विकासाची प्रक्रिया अपेक्षेप्रमाणे होतं नाही. आपण सहज इतर मुलांसोबत त्याची तुलना करतो. परीक्षेच्या गुणावरून त्याचे मूल्यमापन करतो. कमी गुण मिळणारा 'ढ'ठरतो. खरचं तो 'ढ'असतो का? की आपल्या मोजपट्या कमी पडतात? आपण त्याच्या अंगातील कौशल्य शोधून त्याला त्याचे कौशल्य विकसित केले पाहिजे."(दोन शब्द) या बालकादंबरीचे मुखपृष्ठ अतिशय अर्थवलयांकीत व आतील रेखाचित्रे मनोवेधक आहेत. चित्रकार बुद्धभूषण लोंढे यांच्या मनस्वी चिंतनातून ते आले आहेत. निळे निरभ्र आकाश. आकाश गंगेतील ग्रह, तारे व कुत्रा, मांजर, राॅकेट, चंद्र, तारे, गोष्टीचा नायक गजू. खांद्यावर बसलेली सोनी मांजर, दप्तर आणि चित्रांच्या वह्या व फक्त "ढ" हे अक्षर. सौरव प्रकाशनचे मिलिंद जगताप यांनी देखणी कलाकृती दिली आहे. सन्मित्र विशाल तायडे यांच्या लेखनास हार्दिक शुभेच्छा. ============================

No comments: