Wednesday, July 12, 2017

एक अवलिया कलावंत.

मी बी.ए.करीत होतो ते दिवस.लख्ख आठवतात अजून.स.भू.कॉलेजमध्ये शिकायचो.औरंगाबादला.तिथे सांस्कृतिक कार्यक्रमांची कायम रेलचेल.मीही भरभरून भाग घ्यायचो.एक दिवस वर्गात नोटीस आली-विद्यापीठात एक कला कार्यशाळा आहे. कॉलेजमधून दोन जणांना पाठवायचे आहे. मी एका पायावर तयार.प्राचार्यांनीही उत्साह पाहून पाठवलं.
            कार्यशाळेत सहभागी होतांनाच समजलं की एक फार मोठे कलावंत मार्गदर्शनासाठी आलेले आहेत.कार्यशाळा सुरु झाली. नेहरू शर्ट-पायजामा,भरपूर उंची,चेहऱ्याचा भारदस्तपणा वाढविणारी पांढरी दाढी,डोक्याचं अर्धवर्तुळाकार टक्कल आणि डोळ्यावर चष्मा.थेट शास्त्रज्ञ वाटावेत असं व्यक्तिमत्व.
             आयोजकांनी ओळख करुन दिली.
कार्यशाळा सुरु झाली. व्यंगचित्र कार्यशाळा. आम्ही आपआपल्या परीने रेखाटू लागलो.आवड होतीच.थोडाफार सरावही.अचानक विषय सांगितला जायचा.आम्ही आपल्या कौशल्याने व्यंगचित्र रेखाटावं.तेही दिलेल्या वेळेत.तज्ञ मार्गदर्शक प्रत्येक टेबलवर फिरून आमचं काम पाहत.सूचना देत.प्रसंगी स्वत: पेन हातात घेऊन काढून दाखवत.अगदी सफाईदारपणे.आम्ही थक्क होत असू.
            तिसऱ्या दिवशी ते माझ्या टेबलजवळ येऊन थांबले.बराच वेळ बघत राहिले.मग व्यक्तिगत चौकशी केली.व्यंगचित्रांचं कौतूक केलं.कलेत गती आहे.तुझी रेषेवर पकड आहे.खूप सराव कर म्हणाले. बरं वाटलं.
कार्यशाळेच्या शेवटच्या दिवशी मला त्यांनी जवळ बोलावलं.कलेत करीअर करायचं असेल तर मुंबईला जा .संपर्कात रहा.महत्वाचं म्हणजे सराव सुटू देऊ नकोस.उद्याचा मोठा कलावंत होशील म्हणाले.भारावून गेलो.
            नंतर खूप काळ व्यंगचित्र काढतं होतो.एकदा काही व्यंगचित्र रेखाटली.चांगली जमली.त्यांच्यांकडेच पाठवून दिली.पुढच्याच महिन्यात त्यांनी ती एका मासिकात छापून आणली.पाठोपाठ कौतूक करणारं पत्र आणि मानधनाचा चेकही आला.तो आयुष्यात आलेला पहिला चेक होता! पत्रात सराव सुरु ठेव हा मूलमंत्र कायम होता.मात्र काळाच्या ओघात सरावात सातत्य ठेवणे शक्य झाले नाही.व्यंगचित्रं मागे पडली....
              आज सकाळीचं बातमी वाचली.मंगेश तेंडूलकर गेल्याची.आणि हे सगळं आठवलं.डोळे पाणावले.ते विजय तेंडूलकरांचे बंधू.पण स्वत:ची वेगळी वाट चोखळणारे कलावंत.व्यंगचित्रांची त्यांची शैलीही स्वतंत्र.ब्रशचा स्ट्रोकही खूप स्ट्राँग.मी त्याची नक्कल करायचो.अगदी त्यांच्या सहीचीही.
              ८२व्या वर्षी मंगेश तेंडूलकर गेले.खूप काम करून गेले.त्याचा सल्ला मानू शकलो नाही. पुन्हा भेटही झाली नाही.ही खंत कायम राहिल....